राज्यातील १९७ बिल्डरांना ‘महारेरा’ची नोटीस, छापल्या क्रमांकाशिवाय जाहिराती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:31 AM2023-07-22T10:31:29+5:302023-07-22T10:38:18+5:30
‘महारेरा’ची नोटीस
मुंबई : महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील १९७ बिल्डरांना महारेराने नोटीस पाठविल्या आहेत पैकी ९० बिल्डरांची सुनावणी झाली असून, एकूण १८ लाख ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ११ लाख ८५ हजारांचा दंड वसूलही करण्यात आला. त्यात मुंबईतील ५२, पुणे ३४ आणि नागपूर येथील चार बिल्डरांचा समावेश आहे. उर्वरित १०७ बिल्डरांची सुनावणी सुरू आहे.
मुंबई मुख्यालयात सुरुवातीला फक्त याबाबत सुनावण्या घेतल्या जात होत्या. आता मुंबईशिवाय पुणे आणि नागपूर कार्यालयांतही सुनावण्या सुरू झाल्या आहेत. मुंबई क्षेत्रात मुंबई शहर, उपनगर, कोकण, ठाण्याचा समावेश आहे. पुणे क्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगरचा समावेश आहे. नागपूर क्षेत्रात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
बिल्डरांनी काय केले?
काही बिल्डरांकडे महारेरा क्रमांक असूनही तो त्यांनी जाहिरातीत छापला नाही किंवा वाचताही येणार नाही एवढ्या बारीक अक्षरात छापलेला होता. फेसबुक, ऑनलाइन आणि तत्सम अनेक जाहिरातींत महारेरा क्रमांक छापला जात नाही.
नोंदणी आवश्यक
५०० स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त किंवा आठ सदनिकांचा कुठलाही प्रकल्प असल्यास त्याची महारेराकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणी क्रमांक असल्याशिवाय बिल्डरांना प्रकल्पाची कुठल्याही प्रकारची जाहिरात करता येत नाही. ग्राहकांनी फक्त महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करावी, असे आवाहन महारेराने केले आहे.