Join us

राज्यात मागील चार दिवसांत १.९७ लाख रुग्णांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

मुंबई : एप्रिल महिन्याच्या केवळ चार दिवसांत राज्यात १ लाख ९७ हजार नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ९५० ...

मुंबई : एप्रिल महिन्याच्या केवळ चार दिवसांत राज्यात १ लाख ९७ हजार नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ९५० मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील ७२ दिवसांत राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ३० लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात सध्या ४ लाख ३० हजारांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत, तर मुंबईत ६८ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, मुंबईत लवकरच तीन हजार खाटा व ४०० अतिदक्षता खाटांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. सध्या मुंबईत एकूण २१ हजार खाटा आहेत. त्याचप्रमाणे, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा फारसा तुटवडा नाही. राज्यात निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन साठ्यापैकी ८० टक्के साठा हा वैद्यकीय वापरासाठी राखीव ठेवला आहे. महाराष्ट्र राज्यातील दररोजचे ऑक्सिजनचे उत्पादन १२५० मेट्रिक टन इतके असून त्यापैकी ७०० टन साठा वैद्यकीय कारणासाठी वापरला जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जेथे कोविड रुग्ण मोठ्या संख्येने नाहीत अशा राज्यांमधूनदेखील ऑक्सिजन प्राप्त करून घेण्यासाठी प्रशासन स्तरावर चाचपणी सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, मुंबईत रविवारी ५२ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिवसागणिक कोरोनाच्या चाचण्यांच्या क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे, तर दुसरीकडे खासगी रुग्णालय व्यवस्थापकांशी बोलून खाटांच्या उपलब्धतेत समतोल राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या निर्बंधाच्या अंमलबजावणीनंतर संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होईल. तसचे, दुसरीकडे राज्य शासनासह पालिका पातळीवरही आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत.