Join us

पाकिस्तानातून आलेले पहिल्या टप्यातील १९८ भारतीय मच्छिमार अखेर नातेवाईकांच्या स्वाधीन

By मनोहर कुंभेजकर | Published: May 16, 2023 6:29 PM

महाराष्ट्राच्या ५ मच्छिमारांचे नातेवाईकांनी केले जोरदार स्वागत.

मुंबई-भारतातील एकूण ६६६ मच्छिमारा पैकी ५०० मच्छिमार सुटकेचे पाकिस्तान सरकारने जाहीर केल्यानुसार १५ मे रोजी पहिल्या टप्यातील १९८ भारतीय मच्छिमार वेरावल, गुजरात येथे पोलिस व मत्स्यव्यवसाय विभागाने तपासणी करून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत केले व एकमेकांना मिठया मारत भावूक झाले. तेव्हा उपस्थित सर्वच भावूक होऊन त्यांचे अश्रु अन्नावर झाले.

१९८ पैकी गुजरात राज्याचे १८४, महाराष्ट्र राज्याचे ५, आंध्र प्रदेश ३, उत्तर प्रदेश २, दिव ४ मच्छिमार होते. वेरावल येथे पाकिस्तानातून आलेल्या १९८ भारतीय मच्छिमार नातेवाईकांच्या स्वाधीन करताना नॅशनल फिश वर्कर्स फोरम (एनएफएफ)चे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, अखिल गुजरात मच्छिमार चे अध्यक्ष वेलजीभाई मसानी, जेष्ठ पत्रकार जतीन देसाई, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील अर्जुन काकड्या डावऱ्या शनिवार पाडा, सरावली, डाहणू,जयवंत जान्या पाचलकर, पाटील पाडा, कोचाई, तलासरी ३) जितेन जयवंत पाचलकर, पाटील पाडा, कोचाई, तलासरी ४) विलास माधू कोंडारी, डिंबोना,गोवार पाडा, तलासरी ५) जितेश राघू दिवा,जांबूगांव, रयत पाडा, घोलवड या मच्छिमारांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली अशी माहिती किरण कोळी यांनी लोकमतला दिली.

वरील सर्व मच्छिमारांना सोडविण्यासाठी भारतातील मच्छिमारांची राष्ट्रीय संघटना नॅशनल फिशवर्कर्स फोरम(एनएफएफ), दिल्ली फोरम ( डीएफ), पाकिस्तान इंडिया पिपल्स फोरम  फाॅर पिस ॲन्ड डेमोक्रेसी (पीआयपी एफपीडी), पाकिस्तान फिशर फोरम ( पीएफएफ), नॅशनल कमिशन हुमन राईटस ( एनसीएचआर), व यदि फौंडेशन, पाकिस्तान (ईएफ ) या  विविध संघटना मच्छिमारांना सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यात त्यांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. त्याच बरोबर ईएफने मलीर, कराची तुरुगांतून लाहौर वाघा बॉर्डर पर्यंत सुरक्षा दिली तसेच प्रत्येक मच्छिमारांना  पाच हजार रुओये आर्थिक मदत दिली. तर एनसीएचआरच्या अध्यक्षा रबीया झेवेरी यांनी विशेष सहकार्य केले अशी माहिती रामकृष्ण तांडेल यांनी दिली.

दुसऱ्या टप्यात दि,२जून २३ रोजी २०० मच्छिमार व तिस-या टप्यात दिनांक दि, ३ जुलै २३ रोजी १०० मच्छिमार सोडण्यात येणार आहेत, उर्वरित १६६ मच्छिमारांना देखील सोडण्याची विनंती पाकिस्तान सरकारला करित आहोत. त्याच बरोबर भारतात अटक असलेले पाकिस्तानातील ८३ मच्छिमारांना त्वरित सोडण्याची विनंती भारत सरकारला करित असल्याचे तांडेल म्हणाले.

टॅग्स :मुंबईपाकिस्तान