ठाणे : बनावट डी फार्मसी तसेच अन्य पदविकांसाठी प्रवेश देण्याच्या नावाखाली मुंबई ठाण्यातील सुमारे ६९२ विद्यार्थ्याची आठ कोटी ३९ लाख ५१ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा राजस्थानच्या ओपीजेएस विद्यापिठाविरुद्ध काूपरबावडी पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणामध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालेले दीप पॅरामेडिकल आॅरगनायझेशनचे संचालक पुरुषोत्तम ताहिलरामानी (७३) यांनीच न्यायालयामार्फत हा गुन्हा दाखल केल्याने या प्रकाराला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
बनावट डी-फार्मसीचे प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदार आणि त्यांना बनावट प्रमाणपत्रे देणाºया ताहिलरामानी यांच्यासह १७ जणांच्या टोळीला यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ताहिलरामानी यांचे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी प्रलंबित आहे. या आधी दहावी आणि बारावीची बनावट प्रमाणपत्र बनविल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरा गुन्हा बनावट विद्यापिठाची प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केला आहे. पहिल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. आता ताहिलरामानी यांनी ठाणे न्यायालयामार्फत कलम १५६ नुसार दाखल केलेल्या याचिकेनुसार ओपीजेएस विद्यापिठाचे अध्यक्ष जोगिन्दर सिंह तसेच जितेंद्र कुमार यादव, ओपीजेएसचे समन्वयक दीपक पुरी आणि सचिव प्रिया जैन आदींविरुद्ध १२ आॅक्टोबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला आहे. दीप पॅरामेडिकल च्या माध्यमातून २०१५ ते २०१८ या तीन वर्षांच्या काळात प्रवेश घेतलेल्या ६९२ विद्यार्थ्यांची शुल्कापोटी आठ कोटी ३९ लाखांची रक्कम घेण्यात आली. परंतु, या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळे ताहिलरामानी यांनी न्यायालयामार्फत हा गुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. तर डी आणि बी फार्मसी कॉलेजचे प्रशिक्षण घेण्याबाबतची कोणतीही अधिकृत मान्यता नसतांना राजस्थानचे ओपीजीएस विद्यापीठ आणि इतर विद्यापिठांच्या नावाने प्रवेश दाखवून दोन लाख ६७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाण्याच्या मनोरमानगर येथील उमाकांत यादव (२१) या तरुणाने यापूर्वीच ताहिलरामानीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण, याच प्रकरणात ताहिलरामानी यांनी राजस्थानच्या विद्यापिठाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.ताहिलरामानी यांनी राजस्थानच्या विद्यापीठाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयामार्फत हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक राजस्थानला पाठविण्यात येणार आहे.- अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी पोलीस ठाणे.