राज्यात एप्रिलपर्यंत मलेरियाचे १ हजार ९०८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:06 AM2018-06-18T05:06:28+5:302018-06-18T05:06:28+5:30
मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनीही डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनीही डोक वर काढण्यास सुरुवात केली आहे. यंदा जानेवारी ते एप्रिल २०१८ या काळात राज्यभरात १ हजार ९०८ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु, पावसाळ््याच्या दिवसात हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यात राज्यात गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ साली १९ जणांचा बळी गेला. तर २०१६ आणि २०१५ साली अनुक्रमे २६ , ५९ जणांचा मलेरियामुळे मृत्यू ओढावला. गेल्यावर्षी जी/दक्षिण विभागांत १००० मलेरियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर एफ/दक्षिण आणि ई विभागात प्रत्येकी ५०० रुग्ण दिसून आले होते.
देशात गेल्या दहा वर्षांमध्ये मलेरिया प्रकरणांमध्ये २00४ मध्ये १.९२ दशलक्ष तर २०१४ मध्ये १ दशलक्ष नोंद झाली होती. याचा अर्थ ४२ टक्क्यांनी घट झाली. मलेरियामुळे मृत्यूंची संख्या ९४९ वरून ५६२ इतकी कमी झाल्याचे नॅशनल फ्रेमवर्क फॉर मलेरिया एलिमेशनची माहिती आहे. डासांच्या उच्चाटनासाठी आरोग्य आणि कुटुंब हित मंत्रालयाने २०३० पर्यंत आराखडा तयार केला असून त्याप्रमाणे उपाययोजना केल्या जात आहेत.
याविषयी डॉ. लक्ष्मण शौरे यांनी सांगितले की, हिवताप किंवा मलेरिया हा आजार परोपजीवी जीवाणूपासून होतो, हे आपल्याला माहीत आहे. हा जीवाणू इतका सूक्ष्म असतो की, आपण नुसत्या डोळ्यांनी तो पाहू शकत नाही. ताप, हुडहुडी भरणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळणे आणि उलटी होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत. काहीवेळा याची लक्षणे ४८ तास ते ७२ तासांमध्ये पुन्हा दिसून येतात. व्यक्तीला कोणत्या परोपजीवी जीवाणूचा संसर्ग होऊन हिवताप झाला आहे यावर या आजाराची तीव्रता अवलंबून असते.