दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:16 AM2024-05-11T09:16:13+5:302024-05-11T09:16:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डोक्यावर तळपता सूर्य, त्यात तप्त झालेले रस्ते, उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा... या सगळ्यात ...

1pm to 4pm closed campaign; Activists are relaxing to avoid heatstroke | दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम

दुपारी १ ते ४ प्रचार बंद; उन्हाचा त्रास टाळण्यासाठी कार्यकर्ते करत आहेत आराम

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डोक्यावर तळपता सूर्य, त्यात तप्त झालेले रस्ते, उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा... या सगळ्यात घसा फोडून घोषणा द्यायच्या, रॅलीतील प्रत्येकाकडे लक्ष ठेवायचे, कपाळावरचा घाम पुसत रॅली पुढे सरकवायची अशी कसरत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना करावी लागत आहे. मात्र, उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी आता दुपारी १ ते ४ प्रचार करण्याकडेच उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा कल आहे. या कालावधीत कार्यकर्ते शक्यतो घरी किंवा पक्ष कार्यालयातच आराम करतात. मग सायंकाळी ५ पासून पुन्हा प्रचाराला वेग येतो. असा साधारणत: दिनक्रम सुरू आहे. 

एप्रिल आणि मे महिन्यातील उष्णतेच्या लाटांनी मुंबईकरांचा जीव काढला आहे. मेच्या तुलनेत एप्रिल महिना अधिक तापदायक ठरला असून, मे महिन्यातही हवामानात होणारे बदल त्रासदायक ठरले आहेत. ३९ अंशावर गेलेला पारा आता खाली उतरला असून, ३४ वर दाखल झाला असला तरी वाढती आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे. हवामानातील याच बदलाचा कार्यकर्त्यांना फटका बसू नये, म्हणून राजकीय पक्षांकडून आवर्जुन दुपारच्या टळटळीत उन्हातील प्रचार टाळला जात आहे.

सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० दरम्यान प्रचार केला जातो. दुपारच्या वेळेत पुढील प्रचाराची रुपरेषा ठरविणे, चौकसभा, मशाल रॅली, जाहीर सभा आणि परवानग्यांचे नियोजन केले जाते. 
- प्रकाश सोनमळे, 
मविआचे कार्यकर्ते, मुंबई उत्तर पूर्व 

कार्यकर्त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ज्युस, अल्पोपहार दिला जातो. शक्यतो दुपारी प्रचारावर भर दिला जात नाही. दुपारच्या काळात कार्यालयात कार्यकर्ते विश्रांती घेतात किंवा पुढील नियोजनाची तयारी करतात.
- विनोद घोलप, मविआचे कार्यकर्ते, मुंबई उत्तर 

दुपारी १ ते ४ दरम्यान प्रचार टाळला जातो. उन्हाचा तडाखा कार्यकर्त्यांना बसू नये म्हणून विश्रांतीवर भर दिला जातो.
- संतोष जाधव, 
मविआचे कार्यकर्ते, मुंबई दक्षिण 


उष्णतेच्या झळांचा फटका रॅली किंवा कार्यकर्त्यांना बसू नये यासाठी दुपारी प्रचार टाळला जातो.
- जगन्नाथ गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पश्चिम उपनगरे 

Web Title: 1pm to 4pm closed campaign; Activists are relaxing to avoid heatstroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.