Join us

अन्न नासाडीची जनजागृती करणाऱ्या देखाव्याला प्रथम पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 1:52 PM

पालिकेचा श्रीगणेश गौरव स्पर्धेचा निकाल झाला जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पालिकेच्यावतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३’ या स्पर्धेत लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक मंडळाने प्रथम पुरस्कार पटकाविला आहे. या मंडळाने ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या संकल्पनेवर आधारित प्रतीकात्मक देखाव्यातून अन्न नासाडी आणि भुकेलेल्यांना अन्न, तसेच पारंपरिक अन्नपद्धती याबाबत जनजागृती केली. 

दुसरा क्रमांक पटकाविलेल्या माझगाव येथील ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामान्य कार्यकर्त्यांची विविध रूपे आणि त्यांच्या कार्याचा चलचित्रात्मक देखावा सादर केला, तर तिसरा क्रमांक मिळालेल्या परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शिवरायांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित देखावा सादर केला आहे.

अन्य मंडळांनीही पटकाविले पुरस्कारयंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट गणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी येथील श्री गणेश क्रीडा मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक प्रभाकर मुळ्ये (विकास मंडळ साईविहार, भांडुप) यांना, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे, प्रदीप पंडित (पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ) यांना जाहीर करण्यात आले.

    नागरी सेवा-सुविधा, तसेच जनहिताचा संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने पालिकेकडून दरवर्षी श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३४ वे वर्षे असून, या स्पर्धेत ६१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. परीक्षक म्हणून प्रा. नितीन केणी, प्रा. आनंद पेठे, प्रा. नितीन किटुकले अशा एकूण नऊ तज्ज्ञांनी परीक्षण केले.

टॅग्स :मुंबईगणपती