सागर नेवरेकर मुंबई : महाराष्ट्र पक्षिमित्र हे पक्षिमित्रांचे संघटन आणि सातत्याने होणारे पक्षीमित्र संमेलन हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य. देशात असे संघटन व अशी संमेलने होणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य. राज्यभरातील ही सर्व मंडळी एकत्र जोडली जाणार आहेत, ती महाराष्ट्रातील ‘पक्षिमित्र’ या एका व्यासपीठावर. निमित्त आहे, ११ ते १२ जानेवारी दरम्यान रेवदंडा येथे होणाऱ्या ३३व्या पक्षिमित्र संमेलनाचे.या संमेलनाचे आयोजक ‘अमेझिंग नेचर’ ही नवखी संस्था असली, तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षिमित्र त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहेत, ही या चळवळीची जमेची बाजू आहे. संमेलन विभागीय संमेलनाच्या श्रेणीत आजवर सर्वात जास्त संमेलने विदर्भात झाली. गत वर्षी १९ वे विदर्भ पक्षिमित्र संमेलन चंद्रपूर येथे पार पडले. या वर्षी २० वे विदर्भ संमेलन बुलडाणा जिल्ह्यात लोणार येथे होणार आहे.>संमेलनासाठी नोंदणी आवश्यक३३ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन ११ व १२ जानेवारी २०२० रोजी रेवदंडा येथे पार पडणार आहे. संमेलनाची नोंदणी सुरू झाली असून, त्याची अधिक माहिती पक्षिमित्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संमेलनास येणारा प्रमुख अतिथी आणि इतकेच काय, तर संमेलनाध्यक्षसुद्धा आपली नोंदणी करतात, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य.>महाराष्ट्रामध्ये ८० च्या दशकात पक्ष्यांचा अभ्यास करणारी, पक्षीनिरीक्षण हा छंद जोपासणारी अगदी बोटावर मोजण्याइतपत मंडळी होती. त्यावेळी पक्षी अभ्यासक प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने १० जानेवारी, १९८१ रोजी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली काही पक्षिप्रेमी मंडळी लोणावळा येथे जमली. या अनौपचारिक मेळाव्यातूनच महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनांची मुहूर्तमेढ रोवली गेली.- डॉ. जयंत वडतकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना
३३वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रेवदंड्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:48 AM