राज्यभरात २ हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त, एकनाथ शिंदे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 05:58 AM2019-05-30T05:58:58+5:302019-05-30T05:59:01+5:30
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात ३७४ तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात ३७४ तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ८०४ आरोग्य संस्था, तसेच दोन हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. तंबाखूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असून, तंबाखूविरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रुजविणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या राज्यस्तरीय सोहळ्यात ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य म्हणून पुढे आले आहे. सर्वांच्या प्रयत्नाने तंबाखूमुक्त आरोग्य संस्था आणि शाळांच्या संख्येत वाढ होईल. रेल्वे, अन्न व औषध आणि पोलीस प्रशासनासह आरोग्य संस्था या कार्यात अग्रभागी असून, हे अभियान ग्रामीण भागापर्यंत पोहचविणार असल्याचे सांगतानाच, मौखिक आरोग्य मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतात आठ ते नऊ लाख व्यक्ती तंबाखूमुळे दगावतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व अशा आजारांबाबत सरकार जनजागृती करीत असून, पानाच्या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच अन्य खाद्यपदार्थ, शीतपेये विक्रीवर बंदी घातल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या वेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, आरोग्यसेवा आयुक्त अनुपकुमार यादव, आरोग्यसेवेच्या सहसंचालक साधना तायडे, आरोग्यसेवेचे अतिरिक्त अभियान संचालक सतीश पवार, जागतिक आरोग्य संघटनेच्या जगदीश कौर, सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी आणि मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
>आतापर्यंत २ कोटी लोकांची तपासणी
मौखिक आरोग्य मोहिमेंतर्गत आतापर्यंत २ कोटी लोकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यसेवा आयुक्त अनुपकुमार यादव यांनी दिली. यंदाचे तंबाखू विरोधी दिनाचे घोषवाक्यदेखील तंबाखू आणि फुप्फुसासंबंधित आरोग्यावरील दुष्परिणासंदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते फुप्फुसाच्या प्रतीकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तीन हजार विद्यार्थ्यांनी ई सिगारेट विरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली होती. ही ई सिगारेट बंद करण्यासाठीचे निवेदन या वेळी देण्यात आले. पेन्सीलच्या प्रतिकाने ई-सिगारेट नष्ट करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या हातात ई हुक्का किंवा सिगारेट न येता पेन आणि पेन्सील येऊन देशाचे भवितव्य घडविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना या वेळी करण्यात आले.