एलएलएम अभ्यासक्रमासाठी २ सीईटी
By admin | Published: June 12, 2017 03:01 AM2017-06-12T03:01:32+5:302017-06-12T03:01:32+5:30
मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मुंबई विद्यापीठात यंदा एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मुंबई विद्यापीठात यंदा एलएलएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दोन वेळा घेतली गेल्याने एकच गोंधळ उडाला आहे. सामाईक प्रवेश परीक्षा दोनदा कशी घेतली गेली? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई विद्यापीठात फोर्ट कॅम्पस आणि कोकण विभाग अशा दोन ठिकाणी एलएलएमचा अभ्यासक्रम सुरू आहे. ३ जून रोजी मुंबई विद्यापीठाने एलएलएमच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली; पण त्यानंतर पुन्हा एकदा १० जून रोजी कोकण विभागाने एलएलएमच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली. दोन्ही ठिकाणी मुंबई विद्यापीठातर्फे एलएलएमचा अभ्यासक्रम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी परीक्षा आणि अभ्यासक्रम एकच आहे. असे असतानाही दोन प्रवेश परीक्षा घेतल्याने विद्यापीठातला सावळा गोंधळ समोर आला आहे.
३ जूनला घेतलेल्या प्रवेश परीक्षेतही विद्यापीठाने गोंधळ केला होता. प्रश्नांची पुनरावृत्ती झाली होती. काही प्रश्नांची उत्तरे बोल्ड केलेली होती. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेवरच उत्तरे लिहायला सांगितल्याने त्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या नव्हत्या. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थी त्रस्त झाले होते. त्यातच कोकण विभागाने स्वतंत्र परीक्षा घेतल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. एलएलएमच्या प्रवेशासाठी दोन स्वंतत्र प्रवेश परीक्षा घेतल्या जातात, हे चुकीचे आहे. विद्यापीठाने यावर कारवाई करावी, असे स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले आहे.
या संदर्भात मुंबई विद्यापीठ विधि प्रबोधिनीचे संचालक डॉ. अशोक येंडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले.