मेट्रो-३ मार्गिकेचे ६२ टक्के भुयारीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:27 AM2019-09-20T01:27:12+5:302019-09-20T01:27:14+5:30
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे सात टप्प्यांमध्ये काम सुरू आहे.
मुंबई : कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे सात टप्प्यांमध्ये काम सुरू आहे. या संपूर्ण मार्गिकेसाठी ५५ किमी भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत (एमएमआरसी) करण्यात येत आहे़ आतापर्यंत ३२ किमी मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मुंबई आणि मुंबईलगतच्या भागांमध्ये मेट्रोचे जाळे वेगाने उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे़ या संपूर्ण मार्गिकेसाठी आतापर्यंत सतरा टनेल बोरिंग मशीन भुयारीकरणाच्या कामासाठी शाफ्टमध्ये (विवर) उतरविण्यात आल्या आहेत़ भुयारीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्या वेळी माहिमच्या शाफ्टमध्ये टीबीएम उतरविण्यात आले होते. या प्रकल्पामध्ये भुयारीकरणासाठी
सतरा टीबीएम विविध भागांमध्ये कार्यरत करण्यात आले आहेत. ही टीबीएम भूगर्भामध्ये उतरविण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नया नगर, बीकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारीपुत नगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ येथे शाफ्ट तयार करण्यात आली आहेत.
याचे काम सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे़ सिद्धिविनायक ते धारावीदरम्यान सर्वांत मोठा टप्पा आहे. यामध्ये
११.०२ किमीच्या भुयारीकरणापैकी ६.८९ किमी भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़