पूरग्रस्तांना २ कोटींची मदत, मुंबई विद्यापीठ ठरले अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:48 PM2023-11-08T13:48:16+5:302023-11-08T13:48:25+5:30
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२१-२२ या वर्षासाठी हे पुरस्कार जाहीर केले.
मुंबई : राज्य सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार मुंबई विद्यापीठास जाहीर झाला आहे तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव आणि कार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिक यांची निवड झाली आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने पूरग्रस्तांना सुमारे २ कोटी रुपयांची मदत केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२१-२२ या वर्षासाठी हे पुरस्कार जाहीर केले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने दिलेल्या भरीव योगदानाची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार म्हणून आर. डी. नॅशनल महाविद्यालयातील विजेंद्र शेखावत यांची निवड करण्यात आली. तर याच महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या महाविद्यालयातील विद्यार्थी ए. सेल्वा प्रकाश यास सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार मिळाला.
७८,९४५ युनिट रक्त केले जमा
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने विविध रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक ७८,९४५ युनिट रक्त जमा केले आहे.
सुमारे २ कोटी रुपयांची पूरग्रस्तांना मदत, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना मदत, दोन हजारांहून अधिक गृहसंकुलाचे निर्जंतुकीकरण, दत्तक गावे, आरोग्य, नेत्र, लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आदींमध्ये भाग घेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
आजमितीस मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेची ४५९ युनिट कार्यरत असून ४१,५०० स्वयंसेवक कार्यरत आहेत.