Join us

धनंजय मुंडेंच्या नावाने माटुंग्यातील व्यावसायिकाची २ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 8:18 AM

गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी विधानभवनात भेटीगाठी

मुंबई : गुन्ह्यातून सुटका करण्यासह मद्य परवाना आणि गुंतवणुकीच्या नावाखाली माटुंगा येथील एका व्यावसायिकाची दोन कोटीना फसवणूक करण्यात आली आहे. टोळीतील एकाने तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काम करत असल्याचे सांगून विधानभवनात भेटीगाठी घेतल्या. व्यावसायिकाने पैसे परत मागताच त्यांना बंदुकीच्या धाकात धमकावले. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेताच माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

माटुंगा परिसरात राहणारे एरीक जिमी अंकलेसरिया (४३)  यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दखल केला. डिसेंबर २०२० मध्ये तुर्भे पोलिस ठाण्यात दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याच्यावर अटकेची कारवाई झाली.  याच दरम्यान कोरोनामुळे खारघर येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचार घेत असताना त्यांची अली रझा शेख (२६) सोबत ओळख झाली. अलीने न्यायालय, मंत्रालयात ओळख असून, गुन्ह्यातून बाहेर काढू शकतो, असे सांगितले.

बंदुकीचा दाखविला धाक

२७ सप्टेंबर २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान अलीसह अली रझा शेख, जय उर्फ राजू मंगलानी, वाल्मीक गोल्हेर, विजय नाडर, विक्रांत डी. सोनवणे यांनी विश्वास संपादन करत वेळोवेळी १ कोटी ९५ लाख ६८ हजार रुपये उकळले. पैशांसाठी तगादा लावताच त्याने टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागताच त्यांना बंदुकीच्या धाकात धमकावले. अखेर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.