मुंबई - २८ लाख मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी न्हावा-शेवा बंदरात केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावा-शेवा बंदरातून चीन येथे काही सामानांची निर्यात करण्यासाठी दाखल झाले होते. दरवाजाबाहेर ठेवण्यात येणाऱ्या पायपुसणीची निर्यात करण्यात येणार असल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली. मात्र, पायपुसणीच्या नावाखाली पक्ष्यांची तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, तब्बल २८ लाख मोरपिसे त्या सामानांमध्ये सापडली.
याची किंमत २ कोटी १ लाख रुपये असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या प्रकरणी निर्यातदाराला अटक केली असून, तस्करीत हात असलेल्या इतरांचा डीआरआयचे अधिकारी शोध घेत आहेत.