ठाणे-पालघरमधील शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ४६ कोटींची थकबाकी अखेर खात्यात जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 04:10 PM2019-08-09T16:10:27+5:302019-08-09T16:11:06+5:30
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची दोन महिन्यांची ४६ कोटींची थकबाकी अखेर शिक्षकांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
मुंबई- ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची दोन महिन्यांची ४६ कोटींची थकबाकी अखेर शिक्षकांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
याबाबत भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची विधी मंडळात भेट घेऊन ठाणे-पालघर जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतरांची ७ व्या वेतन आयोगाच्या जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ ची फरक रक्कम मिळाली नसल्याची तक्रार केली होती. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यावर अवर सचिवांनी शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आदेश देऊन वेतनाचा देय फरक असल्याने त्याला प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याचे आदेशात स्पष्ट केले केले व फरकाची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
१४ जून रोजी राज्याच्या शिक्षण संचालकांकडेसुद्धा वेतन फरक देण्याची मागणी केली होती. परंतु १५ जुलै २०१७ च्या शासन निर्णयाच्या काही मुद्द्यांमुळे रक्कम देण्यात अडचण येत होती. जी आरमध्ये चालू आर्थिक वर्षाशिवाय मागील वर्षातील खर्चाचे प्रलंबित दावे थकीत म्हणून गणण्यात यावे, असे नमूद केले होते. परंतु ७ व्या वेतन आयोगाची २ महिन्यांतील रकमेची देयके ही नियमित वेतनाचा देय फरक असल्याने ती थकीत असल्याचे गृहीत धरून प्रशासकीय मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, असे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी पटवून दिल्याने प्राथमिक शिक्षकांना १२ कोटी ३० लाख तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांना ३४ कोटी ५६ लाख असे एकूण ४६ कोटी ८६ लाख रुपये वेतन देयकाचा फरक शिक्षकांच्या खात्यात जमा झाला असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.