मुंबई : रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकिटांचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी यूटीएस ॲप सतत अद्ययावत करण्यात आल्याने मोबाइल तिकिटांची विक्री मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात २.०७ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल ॲपचा वापर केला आहे. यामधून मध्य रेल्वेला २२.१८ कोटींचा महसूल मिळाला आहे.उपनगरीय प्रवाशांची मागणी आणि आवश्यकता समजून घेऊन मध्य रेल्वेवर डिजिटल तिकीटसाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले आहे.
१९ जानेवारी २०२३ पासून यूटीएस ॲपवर फर्स्ट क्लास आणि एसी लोकलमधील प्रवासासाठी एका तिकिटावर ४ प्रवाशांपर्यंत बुकिंग करण्यासाठी सक्षम केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोबाइल तिकिटाकडे आपला कल वाढविला आहे. तसेच आता चुकीच्या पासवर्डमुळे मुंबई विभागाने ॲप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली. तसेच इतर काही बदल केले आहेत. त्यामुळे मोबाईल तिकिटांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वेने प्रशासनाने दिली.