मुंबई : मुंबईस्थित ड्रग तस्कर अली असगर शिराजी याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई केली. मुंबईसह दिल्ली, लखनौ, अहमदाबाद येथे छापेमारी मारून दाेन कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी त्याच्याशी निगडित १० ठिकाणी ईडीने छापेमारी करून पाच लाख ५० हजार रुपयांची रोकड व ५७ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते.
सात कोटी ८७ लाखांच्या १५ किलो ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांत अली असगर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. मे महिन्यात दुबईत पळून जाण्याच्या तयारीत असताना लूकआऊट नोटीस जारी केल्यामुळे पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केली. चौकशीदरम्यान त्याने अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेला पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात पाठविल्याचे निदर्शनास आले. मनी लॉड्रिंग झाल्याचे निष्पन्न होताच या प्रकरणात ईडीने एन्ट्री घेऊन त्याचा ताबा घेतला.
सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने व साथीदारांनी अमली पदार्थांच्या उद्योगाद्वारे गोळा केलेला पैसा परदेशात पाठविण्यासाठी परदेशात काही तंत्रज्ञान कंपन्या स्थापन केल्या आहेत. याद्वारे स्वतंत्र पेमेंट गेट वेची प्रणाली निर्माण करून त्याद्वारे भारतातून परदेशात व परदेशातून भारतात पैशांची फिरवाफिरवी केल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. त्यानुसार केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात मोबाइल, लॅपटॉप, संगणक ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.