मुंबई : नोव्हेंबर महिन्यात केलेल्या नोटाबंदीनंतर रेल्वेकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिला जात आहे. तिकीट काढण्यासाठी स्थानकांतील तिकीट खिडक्यांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करणारे पीओएस मशिन बसवण्यात आले. यात सर्वांत जास्त भर मेल-एक्स्प्रेसच्या तिकीट खिडक्यांवर देण्यात आला आणि त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद देत २ कोटी ३६ लाखांची कमाई मध्य रेल्वेला करून दिली आहे. नोटकल्लोळानंतर केंद्राकडून कॅशलेस व्यवहाराचा पर्याय निवडण्यात आला. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे रेल्वेतील मेल-एक्स्प्रेसचे तिकीट आरक्षणासाठी खिडक्यांवर पीओएस मशिन बसवण्यात आले. यात मध्य आणि पश्चिम रेल्वेकडेही रेल्वे बोर्डाने आवश्यक पीओएस मशिन मागवल्या. त्याची माहिती रेल्वे बोर्डाला दिल्यानंतर जवळपास ६२४ मशिन मध्य रेल्वेवर तर पश्चिम रेल्वेवर ३५० बसविण्यास सुरुवात केली. देशभरातील रेल्वे स्थानकांवर ८ डिसेंबरपासून पीओएस मशिन टप्प्याटप्प्यात बसविण्यास सुरुवात झाली. तर १२ डिसेंबरपासून मध्य आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेवरही बसविण्याचे काम सुरू झाले. ही सेवा सुरू होताच त्याचा वापर करणाऱ्यांत चार पटीने वाढ झाली. ८ डिसेंबर रोजी जवळपास डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे तिकीट काढणाऱ्यांचे प्रमाण अवघे ७ हजार ५४९ एवढे होते. हेच प्रमाण वाढून १९ डिसेंबरपर्यंत २८ हजार २१० एवढे झाले. आता तर ३७,९२३ प्रवाशांनी व्यवहार केला आहे. (प्रतिनिधी)
म.रे.ची २ कोटींची ‘कॅशलेस कमाई’
By admin | Published: February 08, 2017 4:45 AM