गॅसपुरवठा थांबताच परिवहनने भरले २ कोटी
By Admin | Published: May 21, 2015 10:47 PM2015-05-21T22:47:35+5:302015-05-21T22:47:35+5:30
ठाणे परिवहन सेवेला अल्टीमेटम देऊनही त्यांनी महानगर गॅसची थकबाकी अदा न केल्याने अखेर गुरुवारी महानगर गॅसने परिवहनचा गॅस पुरवठाच बंद केला.
ठाणे : ठाणे परिवहन सेवेला अल्टीमेटम देऊनही त्यांनी महानगर गॅसची थकबाकी अदा न केल्याने अखेर गुरुवारी महानगर गॅसने परिवहनचा गॅस पुरवठाच बंद केला. तब्बल पाच तास पुरवठा बंद ठेवल्यानंतर अखेर यावर तोडगा काढून परिवहनने एमजीएलला २ कोटी २० लाखांची थकबाकी अदा केल्यानंतर हा पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला. तोपर्यंत वागळे आगारात बसच्या रांगा लागल्या होत्या.
२००६ पासून ते आजपर्यंत परिवहनने एमजीएलचे तब्बल १९.६६ कोटी थकविले होते. ही थकबाकी मिळावी म्हणून महानगर गॅसने परिवहन सेवेला मागील आठवड्यात अल्टीमेटम दिला होता. परंतु परिवहनने यात कोणताही तोडगा न काढल्याने अखेर गुरवारी सकाळी १० वाजता एमजीएलने परिवहनचा गॅस पुरवठा बंद केला. सकाळचे सत्र असल्याने पहिल्या फेरीच्या बस आगारातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे येथे फारसा ताण दिसून आला नाही. परंतु ३ वाजेपर्यंत हा पुरवठा बंद होता.
पहिल्या फेरीच्या बसेस पुन्हा वागळे आगारात सीएनजी भरण्यासाठी आल्याने येथे २० हून अधिक बसच्या रांगा लागल्या होत्या. तसेच वाहतुकीवर सुध्दा परिणाम झाल्याचे परिवहनच्या सूत्रांनी सांगितले. काही मार्गांवरील बसच्या फेऱ्या या कमी तर काही ठिकाणी रद्द करण्याची वेळ आली. परंतु सकाळचे सत्र संपल्याने याचा फारसा परिणाम जाणावला नसल्याचा दावा परिवहनने केला
आहे.
या संदर्भात तत्काळ पालिका आयुक्तांशी चर्चा करुन परिवहनने यावर तोडगा काढून महानगर गॅसच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन थकीत रकमेपैकी २ कोटी २० लाखांचा धनादेश दिला. यामध्ये २ कोटी पालिकेच्या आणि २० लाख परिवहनच्या तिजोरीतून देण्यात आले. परंतु आता उर्वरित रक्कम कशी आणि किती टप्यात अदा करायची या संदर्भातील बैठक येत्या सोमवारी घेण्यात येणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. या बैठकीत या संदर्भातील धोरण देखील ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी केली मध्यस्थी
एमजीएलने गॅसपुरवठा थांबवल्यास बसेस जागीच उभ्या राहतील व त्याचा फटका लाखो प्रवाशांना होईल याची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी एमजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून ठाणे महापालिकेला एमजीएलला दोन कोटींचा धनादेश देण्याचे निर्देश दिले.
रोजचा खर्च अडीच ते तीन लाख : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात ३१३ बस असून त्यातील १२८ बस या सीएनजीवर धावतात. पैकी रस्त्यावर ८० ते ९० बस या सीएनजीवर धावत असल्याची माहिती परिवहनच्या सूत्रांनी दिली. रोज या बसेसला ७५०० ते ८००० किलोग्रॅम सीएनसजी लागत असून सध्या त्याचा दर ४३.९० रुपये किलो एवढा आहे. त्यानुसार रोज रस्त्यावर धावणाऱ्या बससाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च होत आहे.