सल्लागाराला वाढीव दोन कोटी; महापालिका आयुक्तांचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:59 AM2018-10-13T02:59:14+5:302018-10-13T03:00:17+5:30
पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराला तब्बल दोन कोटी वाढवून चार कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे.
मुंबई : पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामाचा आराखडा तयार करणाऱ्या सल्लागाराला तब्बल दोन कोटी वाढवून चार कोटी रुपये देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे़ हा सल्ला पालिकेला महाग पडला आहे़ त्यामुळे हा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला आहे़ विशेष म्हणजे कोणत्याही विकासकामात १५ टक्क्यांपेक्षा वाढीव कंत्राटाला मंजुरी देणार नाही, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्प्ष्ट केले होते. ही वाढ शंभर टक्के आहे.
पावसाळा संपल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील तब्बल एक हजार रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी शहर, पूर्व व पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र सल्लागाराची निवड करण्यात आली होती.
मात्र २०१२-२०१३ आणि २०१३-२०१४ या कालावधीत या कंपनीला दोन कोटी रुपये देण्यात येणार होते. मात्र कामाचे स्वरूप वाढल्यामुळे हा खर्च तब्बल दोन कोटी तीन लाख रुपयांनी वाढला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या सल्लागाराला आता चार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. कंत्राटातील मूळ रकमेपेक्षा वाढीव खर्चाचे अनेक प्रस्ताव येऊ लागल्याने नवीन १५ टक्क्यांची मर्यादा पालिका आयुक्तांनी त्यावर घातली होती. त्यानुसार १५ टक्क्यांवरील वाढीव खर्च मंजूर करण्यात येणार नव्हते. परंतु, आपलाच नियम प्रशासनाने मोडून सल्लागाराला शंभर टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव आणला आहे.
संकल्पचित्रासाठी दिले होते २ कोटी रुपये
च्पश्चिम उपनगरातील सिमेंट व डांबरी रस्त्यांच्या कामांसाठी २०११ ते २०१३ या कालावधीकरिता मेसर्स कन्स्ट्रुम कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सल्लागार नेमण्यात आले होते. या सल्लागार कंपनीला रस्ते कामांचे संकल्पचित्र तयार करण्यासाठी दोन कोटी रुपये देण्याचे पालिका प्रशासनाने निश्चित केले होते.