- खुशालचंद बाहेतीमुंबई : मुंबई पोलिसांनी एका लैंगिक छळाच्या गुन्ह्याचा तपास केवळ एक आठवड्यात पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पाठविले तर, न्यायालयाने २ दिवसात खटला पूर्ण करून आरोपीला शिक्षा दिली. आरोपीच्या अटकेपासून २० दिवसांत शिक्षा हा अलीकडच्या काळातील विक्रमी कमी वेळेत पूर्ण झालेला खटला असावा.१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी कार्यालयातील कामकाज संपवून एक महिला स.का. पाटील उद्यानात गेली. तेथे ती बाकावर बसून मोबाईलवर सीएचा क्लास करीत असताना एक माणूस आजूबाजूला फिरत असल्याचे लक्षात आले. ती घाबरून उठली व दुसऱ्या बाकावर बसली. पण, तो माणूस तिकडेही आला. इतकेच नव्हे तर पँटची चैन काढून तिच्याकडे येऊ लागला. महिला घाबरून उद्यानाच्या गेटकडे धावली. दरम्यान तिला दोन लोक दिसले. त्यांच्या मदतीने तिने त्या व्यक्तीला पकडले व नंतर पोलिसांना बोलावले. त्या व्यक्तीचे नाव राजकुमार तांडेल असल्याचे तिला सांगण्यात आले. महिला पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सर्वांना एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आणले. महिलेच्या तक्रारीवरून ३५४ (विनयभंग), ३५४ (अ) (लैंगिक छळ) ३५४ (ड) (महिलेचा पाठलाग) आयपीसीअन्वये गुन्हा नोंदविला. पल्लवी जाधव या उपनिरीक्षकांनी या गुन्ह्याचा तपास एकाच आठवड्यात पूर्ण करून न्यायालयात दोषारोप दाखल केले. गुन्ह्याच्या तपासात राजकुमार तांडेलविरुद्ध यापूर्वी कफ परेड पोलीस ठाण्यात ३ व आझाद मैदान ठाण्यात एक गुन्हा अशाच प्रकारचा दाखल असल्याचे व एका गुन्ह्यात तर शिक्षाही झाल्याचे पुरावे पल्लवी जाधव यांनी दाखल केले. पहिल्या दिवशी सर्व ५ साक्षीदारांचे जवाब नोंदविले. दुसऱ्या दिवशी सरकार व आरोपींचा युक्तिवाद ऐकला व त्याच दिवशी कामकाज संपण्यापूर्वी राजकुमार तांडेल याला ३ वर्षाची शिक्षा ठोठावली.लैंगिक छळाचा गुन्हा हा भारतीय अपराधीक कायद्यातील सर्वात जघन्य अपराध आहे. यात फक्त शरीरावरच नव्हे तर, तिच्या आत्म्यावरही आघात होतो. कोणतेही औषध यावर उपचार करू शकत नाही.- यशश्री मारूळकर, महानगर दंडाधिकारी, मुंबई
लैंगिक छळाचा गुन्हा: आठवड्यात तपास; २ दिवसांत खटला, ३ वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 6:18 AM