‘ईडी’च्या रडारवर २ डझन गेमिंग ॲप, ११ लाख कोटींची उलाढाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:08 AM2024-08-20T09:08:48+5:302024-08-20T09:09:13+5:30

महादेव ॲप प्रकरणाचा फटका देशातील लाखो लोकांना बसला. या ॲपच्या मालकांनी हवाला आणि अन्य मार्गे हा पैसा दुबईत वळवल्याचे आढळले.

2 dozen gaming apps on ED's radar, turnover of 11 lakh crores? | ‘ईडी’च्या रडारवर २ डझन गेमिंग ॲप, ११ लाख कोटींची उलाढाल?

‘ईडी’च्या रडारवर २ डझन गेमिंग ॲप, ११ लाख कोटींची उलाढाल?

मुंबई : अवैधरीत्या ऑनलाइन गेमिंप ॲप चालवत त्याद्वारे हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या महादेव ॲपचा पर्दाफाश झाल्यानंतर अशाच प्रकारे गैरव्यवहार करणारी दोन डझनांहून अधिक ॲप ‘ईडी’च्या रडारवर आली आहेत. या ॲपच्या माध्यमातून ११ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. 

महादेव ॲप प्रकरणाचा फटका देशातील लाखो लोकांना बसला. या ॲपच्या मालकांनी हवाला आणि अन्य मार्गे हा पैसा दुबईत वळवल्याचे आढळले. मात्र, याच धर्तीवर परदेशातून अनेक ॲप चालवली जात असून, या ॲपनी भारतात आपले हातपाय पसरल्याची माहिती ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या ॲपद्वारे जमा होणारे पैसे क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून तसेच काही बनावट आर्थिक व्यवहार करत परदेशात जात असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडे आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे तपास करणे ही यंत्रणांपुढील डोकेदुखी झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, एका ॲपचा सुगावा तपास यंत्रणेला लागल्यानंतर ते ॲप प्रवर्तक तातडीने बंद करतात आणि त्याच धर्तीवर दुसरे ॲप काही दिवसांत सादर करण्यात येत असल्याच्या कार्यपद्धतीचा उलगडा झाला आहे.

ही ॲप्स कोणत्या देशांतील?
‘ईडी’च नव्हे तर अन्य तपास यंत्रणाही आता समन्वयाने या घोटाळ्याचा तपास करत आहेत. रिझर्व्ह बँकेनेही बँकांना अशी ॲप्स अथवा संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ही ॲप्स प्रामुख्याने यूएई, श्रीलंका आणि दक्षिण आशियातील काही देशांतून सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. 
अलीकडेच ईडीने एका ॲप कंपनीला परदेशात पैसे वळवण्यासाठी बनावट व्यवहार करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान संबंधित कंपनीचे ४९ कोटी रुपये ‘ईडी’ने जप्त केले होते तर, या प्रकरणातील पैसा आठ चिनी नागरिकांना मिळाल्याचेदेखील तपासादरम्यान उघड झाले होते.

Web Title: 2 dozen gaming apps on ED's radar, turnover of 11 lakh crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.