परिचारिकांच्या २ इमारती पाडणार
By admin | Published: December 23, 2016 03:42 AM2016-12-23T03:42:20+5:302016-12-23T03:42:20+5:30
जे.जे रुग्णालयात परिचारिकांसाठी असलेल्या वाडिया आणि विल्सन या दोन इमारती लवकरच पाडण्यात येणार आहेत. या इमारतींचे
मुंबई : जे.जे रुग्णालयात परिचारिकांसाठी असलेल्या वाडिया आणि विल्सन या दोन इमारती लवकरच पाडण्यात येणार आहेत. या इमारतींचे पाडकाम सुरू करण्यापूर्वी योग्य पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे.
जे.जे. रुग्णालयाच्या आवारात १०० वर्षे उलटलेल्या वाडिया आणि विल्सन या दोन इमारती आहेत. त्या पाडणार असल्याचे कळताच परिचारिकांनी ताबडतोब महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन आणि बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटनेच्या वतीने १३ डिसेंबर रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहिले.
जे.जे. रुग्णालयाच्या आवारातील वाडिया आणि विल्सन या दोन्ही इमारतींचा वापर ४५० परिचारिका, ४८ विद्यार्थिनी परिचारिका आणि २७ मेडिकल कोर्सच्या विद्यार्थिनींकडून होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतींचे पाडकाम करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)