प्रविण मरगळे
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वन्यजीव रहिवाशी भागात फिरताना दिसत आहे. त्याचसोबत उष्णता वाढल्याने पाण्याच्या शोधात आणि थंडावा घेण्यासाठी वन्यजीव मानवी वस्तीत आल्याचं दिसून आलं. मुंबईतील चारकोप भागात एका घरामध्ये २ फूटाचा नाग आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
चारकोपचा सेक्टर ८ हा भाग गोराई खाडी किनारी तसेच कांदळवन पट्ट्यात येतो. याठिकाणी बहुतांश झाडांचा पट्टा असल्याने सरपटणारे वन्यजीवही मोठ्या प्रमाणात आहेत. उष्णतेमुळे तापमान वाढलं आहे. यावेळी सरपटणारे वन्यजीव थंड ठिकाण शोधण्यासाठी नागरीवस्तीत येतात. अशाप्रकारे चारकोपच्या सेक्टर ८ मधील अंबामाता सोसायटीत सकाळी ८ च्या सुमारास एका घरात नाग आढळल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
या सोसायटीतील रहिवाशी सुमित वाघ यांच्या घरात सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे लगबग सुरु असताना उघड्या खिडकीतून एक नाग घरात शिरला. वेळीच या नागाला पाहिल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सोसायटीतील घरात नाग शिरल्याची बातमी मिळताच नागाला पाहण्यासाठी लोक जमा झाले. त्यानंतर सर्पमित्राला तातडीने बोलावून या नागाला पकडण्यात आल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाग हा थंड तापमानातील वन्यजीव असल्याने उष्णतेमुळे तो नागरीवस्तीत आला असावा. हा २ फूटाचा भारतीय नाग आहे. याला आरेतील जंगलातून सोडण्यात येईल, तसेच यापूर्वीही अनेकदा या परिसरात रहिवाशी सोसायटीमध्ये साप आढळल्याची माहिती सर्पमित्र अंजिक्य पवार यांनी दिली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवई येथील नागरीवस्तीत घराच्या पत्रातून एक हरीण घरात पडल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती स्थानिक प्राणीमित्र संघटना पॉजला दिली. त्यानंतर पॉजचे स्वयंसेवक मारुती वळंजू हे वनविभागासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर या हरणाला पकडण्यात वनविभागाला यश आलं. लगतच्या राष्ट्रीय उद्यानातील प्राणी येथील मनुष्य वस्तीत येण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यापूर्वीही येथे टेकडीवरून हरिण पडल्याची घटना घडली होती, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक सुनिष सुब्रमण्यन कुंजू यांनी दिली होती.