Join us

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची तब्बल २ तास चौकशी; पोलीस पथक बंगल्याबाहेर पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 2:49 PM

रविवारी देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक त्यांच्या घरी पोहचले होते.

मुंबई – भाजपा नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलीस(Mumbai Police) सायबर विभागाने तब्बल २ तास चौकशी केली. पोलिसांनी सुरुवातीला फडणवीस यांना फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. परंतु त्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर येऊन चौकशी करू असा निरोप देण्यात आला.

त्यानुसार, रविवारी देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक त्यांच्या घरी पोहचले होते. याठिकाणी डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसपी नितीन जाधव यांनी फडणवीसांचा जबाब नोंदवला. दुपारी १२ वाजता सायबर पोलीस फडणवीस यांच्या बंगल्यात दाखल झाले होते. त्यानंतर दुपारीच्या २ च्या सुमारास पोलीस पथक जबाब नोंदवून बाहेर पडले. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना नोटीस बजावल्यापासून भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे सकाळपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘सागर’ बंगल्याबाहेर गर्दी केली होती.

 

नोटीस म्हणजे समन्स नव्हे....

या प्रकरणी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, मुंबईमध्ये सायबर सेल विभागात गुन्हा२०२१ मध्ये  नोंद  झाला आणि डेटा बाहेर कसा गेला हा विषय आहे याची चौकशी सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (आयटी ऍक्ट) हा गुन्हा दाखला झाला आहे. आतापर्यंत २४ साक्षीदार यांची साक्ष घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे मत जाणून घेण्यासाठी नोटीस पाठवली. पोलिसांनी पाठवलेल्या नोटिसीत गैर काही नाही. नोटीस म्हणजे समन्स नाही. देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटिसीप्रकरणी आदळ-आपट करण्याची गरज नाही. भाजप राजकीय भांडवल करतंय असा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी केला आहे.

षडयंत्राचा पर्दाफाश केल्यानं नोटीस पाठविली असावी

मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता आहे आणि पोलीस माझ्याकडील माहितीचा स्रोत विचारू शकत नाहीत. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. योग्य उत्तर देणार आहे. मी सरकारच्या आशीर्वादाने विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध झालेल्या षड्यंत्राचा अलिकडे पर्दाफाश केल्याने ही नोटीस पाठविली असावी. फोन टॅपिंग प्रकरणी मी माहिती फोडली नव्हती, सध्याच्या एका मंत्र्यांनीच ती फोडली होती आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामुंबई पोलीसदिलीप वळसे पाटील