Join us

घोड्याच्या मूत्राशयाजवळून काढली ३ किलोची गाठ, पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 1:31 AM

शिवनिकेतन ट्रस्टच्या घोडा प्रशिक्षण विभागातील हा घोडा आहे.

- सागर नेवरेकरमुंबई : परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शुक्रवारी घोड्याच्या मूत्राशयाजवळील तीन किलो वजनाच्या कर्करोगाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कल्याण येथील खडवलीमधील शिवनिकेतन ट्रस्टच्या भारतीय सैनिकी विद्यालय आणि ज्युनिअर महाविद्यालयातील हा घोडा आहे. तो नर जातीचा आहे. सध्या घोड्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, तो डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

शिवनिकेतन ट्रस्टच्या घोडा प्रशिक्षण विभागातील हा घोडा आहे. काही दिवसांपासून या घोड्याच्या मूत्राशयाजवळ गाठ तयार झाली होती. दिवसेंदिवस ही गाठ मोठी होत होती. त्यामुळे झालेली जखम काही केल्या बरी होत नव्हती आणि घोड्याची प्रकृतीही बिघडत होती. त्यामुळे घोड्याला परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

परळ पशुवैद्यकीय रुग्णालयाचे सचिव डॉ. जे. सी. खन्ना म्हणाले की, घोड्याच्या मूत्राशयाजवळ कर्करोगाची गाठ गेल्या सहा महिन्यांपासून होती. शस्त्रक्रियेदरम्यान तीन किलो कर्करोगग्रस्त मांस काढण्यात आले. प्राण्यांच्या कर्करोगामध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे बेनाईन हा एकाच ठिकाणी होणारा कर्करोग आहे, तर दुसरा मॅलिग्नंट हा कर्करोग धोकादायक असून तो शरीरात पसरत जातो. यापैकी हा कर्करोग कोणता आहे, हे पाहण्यासाठी लॅबमध्ये घोड्याच्या कर्करोगाच्या मांसाचे काढलेले नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

घोड्यावरची शस्त्रक्रिया जवळपास चार ते पाच तास सुरू होती. घोड्याच्या मूत्राशयाजवळील रक्तस्त्राव थांबला आहे, तसेच जखमेतून थोड्या प्रमाणात पाणी वाहत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान घातलेले टाके व्यवस्थित असून, घोडा मूत्र विसर्जनसुद्धा करू लागला आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ. गजेंद्र खांडेकर, डॉ. संतोष त्रिपाठी, डॉ. शाहिर गायकवाड, डॉ. सचिन राऊत आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांनी ही शस्त्रक्रिया केली.विशेष भुलीच्या तंत्रज्ञानाचा वापरघोड्यावर विशेष भुलीचे तंत्रज्ञान वापरून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याला ‘ट्रीपल ड्रीप’ असेदेखील म्हणतात. यामध्ये मिनिटाला साधारण ४० ते ५० भुलीच्या औषधांचे ड्रॉप टाकले जातात. त्यामुळे दीर्घकाळ चालणारी शस्त्रक्रिया या भुलीच्या तंत्रज्ञानामुळे शक्य होते.- डॉ. गजेंद्र खांडेकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ)

टॅग्स :मुंबई