Join us  

२ लाख १३ हजार झोपडीधारकांना पक्की घरे! मुंबईतील ७ प्राधिकरणांचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 6:27 AM

एसआरएबरोबर एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, बीएमसीची संयुक्त भागीदारी

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईतील २३३ झोपडपट्ट्यांतील २ लाख १३ हजार झोपडीधारकांना पक्की घरे मिळणार आहेत. आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) हे एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, बीएमसी, महाप्रित, एमआयडीसी आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारीत झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे रस्ते, महामार्ग उभारणारी एमएसआरडीसी, उर्जा क्षेत्रातील महाप्रित, उद्योगांची उभारणीची जबाबदारी असलेली एमआयडीसी यांच्या खांद्यावर आता झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाची जबाबदारी येणार आहे.

विविध प्राधिकरणांवर जबाबदारी

राज्यातील प्रमुख महानगरांतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी एसआरएची स्थापना करण्यात आली होती. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत महानगरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागले नसल्याचे चित्र आहे. त्यातूनच आता मुंबई महानगरातील झोपड्यांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी विविध प्राधिकरणांवर दिली जाणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जूनमध्ये या प्राधिकरणांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत हे प्रकल्प संयुक्त भागीदारीत मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आता या प्राधिकरणांकडून पुनर्विकास प्रकल्पांच्या योजना राबविण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २३३ झोपडपट्ट्यांतील २ लाख १३ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी संयुक्त भागीदारी करण्यात येणार आहे, अशी माहिती एसआरएमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

२४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा विचार

यापूर्वीच एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त भागीदारीत घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून १४,२५७ झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे. 

आता राज्यातील रस्त्यांचे जाळे उभारण्याची जबाबदारी असलेल्या एमएसआरडीसीनेही झोपडपट्ट्यांची यादी तयार केली आहे. तसेच त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीही झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकर सुरुवात करणार आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

एमएसआरडीसी मुंबईतील तब्बल ४५ प्रकल्पांच्या माध्यमातून २४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा विचार करत आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोणते प्राधिकरण, किती प्रकल्प राबविणार ?

प्राधिकरण - प्रकल्प - एकूण झोपड्या

  • बीएमसी     ७८         ५१,५८२
  • महाप्रित     ५६         २५,२११
  • एमएसआरडीसी     ४५         २४२६६ 
  • म्हाडा     २१         ३३,६०७
  • सिडको     १४         २५,७४०
  • एमआयडीसी     १२         २५,६६४
  • एमएमआरडीए     ७         २७,२५१
टॅग्स :मुंबई