मुंबई : मुंबईत दिवसभरात ४९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ७० हजार ६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून, २० ते २६ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची नोंद झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले, तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३७२ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रविवारी ५७८ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ९१४ वर पोहोचली आहे, तर मृतांची एकूण संख्या ११ हजार ७६ इतकी झाली आहे. सध्या शहर उपनगरात ८ हजार ३५५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत शनिवारपर्यंत कोरोनाच्या २३ लाख २ हजार ९०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालिकेने मागील २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील २ हजार ५४ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे, तर शहर उपनगरात झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २८६ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ५८७ इतकी आहे.
चौकट
जी उत्तरमध्ये १४ रुग्ण
धारावीत शुक्रवारी शून्य आणि शनिवारी दादरमध्ये शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. ही दिलासादायक बाब मानली जात आहे, पण आज रविवारी पुन्हा धारावी आणि दादरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जी उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी धारावी ३, दादरमध्ये ७ तर माहीममध्ये ४ असे जी उत्तर मध्ये १४ रुग्ण आढळले आहेत.