लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार १४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून २ लाख ७९ हजार ६४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६६ दिवसांवर पोहोचला आहे. ३ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
सध्या शहर-उपनगरात ७ हजार १८० रुग्ण उपचाराधीन आहेत. शहर-उपनगरात दिवसभरात ६५६ रुग्ण आणि ६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ९८ हजार ८८९ झाली असून बळींचा आकडा ११ हजार १८६ झाला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या २४ लाख ९५ हजार ५६० चाचण्या झाल्या आहेत.
शहर-उपनगरात चाळ व झोपडपट्ट्यांमध्ये १७८ सक्रिय कंटेनमेंट झोन्स असून २ हजार ४७६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३ हजार ३०५ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.