राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:10 AM2022-11-04T06:10:24+5:302022-11-04T06:10:30+5:30

केंद्राकडून २२५ प्रकल्प मंजूर

2 lakh crore investment in the maharashtra; Prime Minister Narendra Modi's announcement at the Employment Fair | राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक; रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

googlenewsNext

मुंबई : राज्यातील प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला जात असल्याचा आरोप होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी घोषणा केली.  महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे, तर काही प्रकल्प लवकरच सुरू होतील, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या १० लाख रोजगार भरती अंतर्गत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात सामूहिक नियुक्तीपत्रे देण्यात आली. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यावेळी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागांत बचतगटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये बचत गटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचतगटांना केंद्र सरकारने साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातील तरुणांना संधी

स्टार्टअप, लघु उद्योगांना शक्य तेवढी आर्थिक मदत सरकारकडून दिली जात आहे. यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. केंद्र सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत आहे. या विकासकामांमुळे राेजगाराच्या लाखाे संधी निर्माण हाेतात. भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांना माेठ्या प्रमाणावर राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान 

वर्षभरात ७५ हजार नोकऱ्या : मुख्यमंत्री शिंदे

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात भरती प्रक्रिया राबविताना एमपीएससीला प्राधान्य देऊन त्याचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टीसीएस आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांमार्फत पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आठवडाभरात पोलीस, महिनाभरात ग्रामविकास भरती - उपमुख्यमंत्री 

येत्या आठवडाभरात १८,५०० पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे तर महिनाभरात ग्रामविकास विभागात १०,५०० पदांची भरती करणार आहोत. सर्व विभागांत पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अनेक पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. ७५ हजार पदभरती झाली तरी जी पदे रिक्त होतील त्यांचीही पदभरती केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

पहिल्या टप्प्यात दाेन हजार जणांना नियुक्त्या

मुंबईतील मेळाव्यात कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात सुमारे ६०० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली असून राज्यात सुमारे दोन हजार उमेदवारांना विभागीय पातळीवर नियुक्तीपत्र देण्यात आली.

Web Title: 2 lakh crore investment in the maharashtra; Prime Minister Narendra Modi's announcement at the Employment Fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.