Join us  

अरे बापरे! मेट्रो ३ मार्गिकेवर एका झाडासाठी २ लाख; ५८४ झाडांसाठी १२ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 9:53 AM

माहिती अधिकारातून बाब उघड, खर्चाच्या रकमेबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे विविध सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवर ५८४ झाडे लावण्यासाठी तब्बल १२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून एक झाड लावण्यासाठी २ लाखांचा खर्च कसा, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित होताना दिसत आहे.

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडावी लागली होती. तसेच आरे वसाहतीत कारशेड उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यात आली होती. मात्र ही झाडे तोडल्यामुळे वाद झाला होता. तसेच पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला होता. त्यातून एमएमआरसीकडून तोडलेल्या झाडांच्या बदल्याने नव्याने झाडांची लागवड केली जाणार आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते गॉडफ्रे पेमेंटा यांनी मेट्रो ३ च्या मार्गावर किती झाडे लावण्यात आली, याची माहिती मागविली होती. त्यावर,  २६ जून २०२४ पर्यंत झाडे लावण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या रकमेची माहिती एमएमआरसीने दिली आहे.

त्यामध्ये वृक्षारोपण करण्यासह तीन वर्षे देखभालीसाठी एमएमआरसीने कंत्राट दिले आहे. त्यामध्ये धारावी ते सीप्झ या १० मेट्रो स्थानकांदरम्यान वृक्ष लागवडीसाठी ३ कोटी ४९ लाख, शितळादेवी ते मुंबई सेंट्रलदरम्यान वृक्ष लागवडीसाठी ३ कोटी ३७ लाख आणि कफ परेड ते ग्रँट रोडदरम्यान वृक्ष लागवडीसाठी ४ कोटी ९४ लाख रुपये खर्च केला आहे. ५८४ झाडे लावण्यासाठी १२ कोटी १ लाख रुपये खर्च झाला आहे.

करदात्यांच्या पैशांची लूट?

एका झाडाची लागवड आणि ३ वर्षे देखभालीसाठी २ लाख ५ हजार रुपयांचा खर्च ही करदात्यांच्या पैशांची लूट आहे. एक झाड लावण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी एवढ्या मोठ्या रकमेची गरज नाही. वृक्षारोपणात गैरप्रकार झाला असेल तर हजारो कोटींच्या संपूर्ण मेट्रो ३ भूमिगत प्रकल्पाचे काय? मेट्रो ३ प्रकल्पाच्या संपूर्ण कंत्राटाची फॉरेन्सिक पद्धतीने चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पेमेंटा यांनी केली. 

कोठे, किती झाडे लावली?

  • कफ परेड    १३०
  • विधान भवन    ३४ 
  • चर्चगेट    ५५
  • हुतात्मा चौक    १०
  • सीएसएमटी    १४२
  • मुंबई सेंट्रल    ३
  • महालक्ष्मी    ३
  • सायन्स म्युझियम    १७
  • सिद्धिविनायक    १०३
  • दादर    २८
  • शितळादेवी    २९
  • एमआयडीसी    ७
  • सीप्झ    २३
टॅग्स :मेट्रोमुंबई