आंबा उत्पादकांना २ लाखांचे विमा संरक्षण
By admin | Published: March 20, 2015 12:11 AM2015-03-20T00:11:06+5:302015-03-20T00:11:06+5:30
आंबा उत्पादकांना अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून यापूर्वी १० हजार रुपये हेक्टरी दिले जात होते.
मुंबई : आंबा उत्पादकांना अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून यापूर्वी १० हजार रुपये हेक्टरी दिले जात होते. भाजपा सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये दिले. सध्या आंब्याच्या झाडांना १ लाख रुपयांचे तर काजूच्या झाडांना ७५ हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. आंब्याच्या झाडांना २ लाखांचे विमा संरक्षण मिळवून देण्याकरिता विमा कंपनीशी चर्चा करू, असे आश्वासन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले.
अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. त्यावर कृषिमंत्री खडसे म्हणाले की, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात इस्रायलच्या सहकार्याने एक संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे आंबा पिकावरील रोगाचा प्रादूर्भाव टाळण्याकरिता उपाययोजना करता येईल. केंद्र शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार अत्यल्प, अल्पभूधारक शेतकरी ठरवले जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत दिली जाते. आंबा पिकाबाबत हे क्षेत्र वाढविण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात येईल. आंबा, काजू यांच्या पिकाला बाजारपेठ मिळवून देण्याकरिता महामँगो बोर्डाची स्थापना आठ वर्षांपूर्वी केली होती. सध्या बंद असलेल्या या बोर्डाचे पुनरुज्जीवन केले जाईल, असेही खडसे म्हणाले.