मुंबई – विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच आता पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची आज बैठक होत असून दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत सापडले आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बोलावलं जाणार आहे. आजच किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोगेश्वरी येथील उद्यानासाठी राखीव जागेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीचा तपास केला जात आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून राजकीय दबाव वापरून ही कामे करून घेतली असा आरोप सोमय्यांनी लावला होता. त्यानुसार वायकरांची चौकशी होणार आहे.
तर दुसरीकडे कोविड सेंटरमध्ये बॉडीबॅग खरेदी घोटाळ्यातून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा तिप्पट किंमत देऊन बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत बीएमसीच्या २ अधिकाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बॉडीबॅग ज्या कंपनीकडून खरेदी करण्यात आले त्यांच्या अधिकाऱ्यांनाही पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत.
दरम्यान, रवींद्र वायकर सकाळी ११ वाजल्यापासून आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. आता किशोरी पेडणेकर यांनाही लवकरच चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. वायकर यांच्यावर गार्डनच्या राखीव जागेवर पंचतारांकित हॉटेल बनवल्याचा आरोप आहे. तर पेडणेकर यांच्यावर कोविड काळातील खरेदी घोटाळ्यात गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही नेते शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले आहेत. त्यामुळे आता ठाकरेंकडील २ शिलेदार मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र समोर आले आहे.