Join us

वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 7:38 AM

कारमधील स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे वापरत असलेल्या आणखी दोन गाड्या एनआयएच्या पथकाने मंगळवारी जप्त केल्या.

मुंबई/नवीन पनवेल : कारमधील स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे वापरत असलेल्या आणखी दोन गाड्या एनआयएच्या पथकाने मंगळवारी जप्त केल्या. एनआयएच्या पथकाने आतापर्यंत त्याच्या एकूण ७ गाड्या जप्त केल्या. त्याच्याकडील अन्य गाड्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.पनवेलमधील कामोठे येथून पांढऱ्या रंगाची आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली. गाडी एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून पार्क करून ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. तपासात त्याचा मालक सचिन वाझे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी ही बाब एनआयएला कळवली. त्यानंतर एक टीम घटनास्थळी गेली व त्यांनी गाडी ताब्यात घेतली. तर दुसरी इनोव्हा ही ठाणे येथील एका ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आली. वाझेला वाहनांची आवड हाेती. या वाहनांचा वापर त्याने गुन्ह्यात केला होता का, याचीही माहिती घेतली जात आहे.यापूर्वी त्याच्याशी संबंधित २ मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा, स्कॉर्पिओसह ५ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. या गाड्यांव्यतिरिक्त ऑडी आणि स्कोडा गाडीचा शोध घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बनावट सीमप्रकरणी अहमदाबादमधील दोघे ताब्यातसचिन वाझे व त्याच्या साथीदारांना बनावट मोबाइल सिम कार्ड पुरविणाऱ्या अहमदाबाद येथील दोघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने मंगळवारी ताब्यात घेतले. एटीएसच्या पथकाने त्यांना अटक करून मुंबईत आणले हाेते. मात्र तपास एनआयएकडे वर्ग झाल्याने त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. -वृत्त/५

टॅग्स :सचिन वाझेपोलिस