मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अदानी समुहाचे २ अधिकारीही उपस्थित?; चर्चेवर शरद पवारांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 09:01 PM2024-08-03T21:01:18+5:302024-08-03T21:03:26+5:30
शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये नेमकी काय खलबते रंगत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे. मागील काही दिवसांतील शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील ही दुसरी भेट होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबते रंगत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच पवार यांच्या भेटीवेळी अदानी उद्योग समुहाचे दोन अधिकारीही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते, असं बोललं जात आहे. याबाबतच्या चर्चेला उधाण येताच शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवार यांनी म्हटलं की, "मी राज्यातील विविध प्रश्नांसंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. अदानी समुहाचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आले असतील तर ते मी गेल्यानंतर आले असावेत," असा खुलासा पवार यांनी केला आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
"एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. राज्य सरकारकडील साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणे तसेच मागील भेटीवेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्न यांच्या निपटऱ्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली," असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक भेट दिली. राज्य सरकारकडील साखर कारखान्यांची प्रलंबित थकहमी प्रकरणे तसेच मागील भेटीवेळी चर्चेत घेतलेले प्रलंबित प्रश्न यांच्या निपटऱ्यासाठी ही भेट उपयुक्त ठरली. pic.twitter.com/4ysu6OgPQc
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2024
दरम्यान, शरद पवारांच्या भेटीविषयी मुख्यमंत्र्यांनीही माहिती दिली आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभा शरद पवार यांनी आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यातील अनेक प्रश्नांवर आमच्यात चर्चा झाली," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे.