Join us

'आठवलेंसारख्या पक्षाचे २ आमदार आले तिकडे', सभागृहात हशा अन् फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 10:06 AM

मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांना टोला लगावत, केवळ कसब्याच्या निकालाकडे न पाहता तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातील ३ राज्यांच्या निकालाकडेही पाहायला हवे.

राज्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विश्लेषण करताना महाविकास आघाडीचे नेते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. तर, कबस्यातील पराभव मान्य करत भाजप नेते ही पोटनिवडणूक असून सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल वेगळे असतील असा दावा करतात. या निकालानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे युतीचा सामना रंगला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले. त्यावेळी, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षाचेही दोन आमदार निवडून आल्याचा दाखला शिंदेंनी दिला. 

मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवारांना टोला लगावत, केवळ कसब्याच्या निकालाकडे न पाहता तुम्ही आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देशातील ३ राज्यांच्या निकालाकडेही पाहायला हवे. मोदींनी गुजरातमध्ये रोड शो केला, गुजरात जिंकले. पण, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली, तरीही मोठा पराभव झाला. आता, तुम्ही कसबा पेठेतील निकालाच्या गोष्टी करता, काहीजणांना तर एवढा आनंद झालाय की, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना.. असा नाच सुरूय, असे म्हणत शिंदेंनी शिवसेना नेत्यांना लक्ष्य केलं. तसेच, आठवलेसारख्या पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी, सभागृहात हशा पिकला. तर, फडणवीसांनी बाक वाजवून, आठवले साहेबांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्याचे म्हटले. तसेच, आठवले आपलेच आहेत, असेही सांगितले. 

रिपाइं कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण

महाराष्ट्रातील या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. पण दुसरीकडे ईशान्येकडील निवडणुकांचे निकालही समोर आले. या निवडणुकीचा निकाल रामदास आठवलेंना आनंद देणारा ठरला. या निकालामुळे पहिल्यांदाच रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने महाराष्ट्राबाहेरच्या विधानसभेत प्रवेश केला. आठवलेंच्या आरपीआय पक्षाचे २ उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत. नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडी असून आठवलेंच्या २ विजयी उमेदवारामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, रामदास आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेतून महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष आहे. तर केंद्रात राज्यमंत्रीपद सांभाळतात. २०१४ पासून ते भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून सहभागी आहेत. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेअजित पवाररामदास आठवले