Join us

मुंबईतील २० ब्लॅक स्पॉट होणार आता सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 2:04 PM

पालिका तयार करणार नवीन आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरातील वाहतूक चौकात ब्लॅक स्पॉटमुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी मुंबईतील सर्वाधिक ब्लॅक स्पॉट अशा २० वाहतूक चौकांमध्ये अपघात कसे टाळता येतील त्यासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे. ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी या संस्थेच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून वाहतूक चौक आणखी सुरक्षित होणार आहे.

मुंबईतील सर्वाधिक अपघातप्रवण वाहतूक चौकांची पुनर्रचना करण्यात येत आहे.  चालक, पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी वाहतूक चौक अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पालिकेला ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टीकडून तांत्रिक सहाय्य मिळणार आहे.

५ जंक्शनला दिली भेट

या ग्लोबल डिझायनिंग सिटीज् इनिशिएटिव्ह  आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांचाही यात समावेश आहे. याविषयीची बैठक गुरुवारी झाली. पालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मनीषकुमार पटेल यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर तज्ज्ञ, परदेशातून आलेल्या मान्यवरांनी मुंबईतील ५ जंक्शन्सला भेट देऊन पाहणी केली.

पालिकेने ब्लॅक स्पॉट ठिकाणी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. उपायुक्त महाले यांनी उपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, मुंबईतील इतर ठिकाणांच्या तुलनेत या २० चौकांच्या ठिकाणी अधिक अपघात होऊन पर्यायाने अधिक मृत्यू आणि जखमींची नोंद झाली आहे. त्यामुळे या चौकांचा कायापालट करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. 

हे आहेत २० ब्लॅक स्पॉट

१) अमर महल जंक्शन, टिळकनगर, घाटकोपर २) पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी- विक्रोळी जोड रस्त्याचा छेदभाग (इंटर सेक्शन), कांजूरमार्ग (पूर्व) ३) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि शीव (सायन) वांद्रे जोड रस्त्याचा छेदभाग (इंटर सेक्शन) (कलानगर चौक), वांद्रे (पूर्व) ४) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जवाहरलाल नेहरू मार्गाचा छेदभाग, सांताक्रूझ (पूर्व) ५) घाटकोपर अंधेरी जोड रस्ता आणि पूर्व द्रुतगती महामार्ग, घाटकोपर (पूर्व) यांचा छेदभाग ६) प्रियदर्शिनी वाहतूक चौक, शीव-चेंबूर ७) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता छेदभाग, जोगेश्वरी (पूर्व) ८) पूर्व मुक्त मार्ग आणि घाटकोपर- मानखुर्द जोडरस्ता छेदभाग, गोवंडी (पश्चिम) ९) शीव वाहतूक चौक, शीव (पश्चिम) १०) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि आकुर्ली मार्गाचा छेदभाग, कांदिवली (पूर्व) ११) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, गोरेगाव (पूर्व) चा छेदभाग १२)  किंग सर्कल वाहतूक चौक, माटुंगा (पूर्व) १३)  पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि एन. एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व) चा छेदभाग १४) सांताक्रुज चेंबूर जोडरस्ता आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला (पश्चिम) चा छेदभाग १५)  शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता, मानखुर्दचा छेदभाग १६)  छेडानगर वाहतूक चौक, घाटकोपर (पूर्व) १७) संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, बोरिवली (पूर्व) १८) साकीनाका वाहतूक चौक, अंधेरी (पूर्व) १९) पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग, दहिसर (पूर्व) चा छेदभाग २०) घाटकोपर - अंधेरी जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्गाचा छेदभाग.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका