मनोहर कुंभेजकर
मुंबई: नेहमीपेक्षा रस्त्यावर 20 ते 30 टक्के थांड मांडून बसलेले अनधिकृत फेरीवाले आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पश्चिम उपनगरात 10000 ची संख्या पार केलेल्या के पूर्व,पी उत्तर व आर मध्य या तीन वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात वाढ झाली असल्याचा निष्कर्ष राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. या तीन वॉर्डमध्ये त्यांनी भेट देऊन त्यांचा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केला.
डॉ. दीपक सावंत यांनी या तीन वॉर्डला भेटी देऊन तेथील वॉर्ड ऑफिसरशी येथील कोरोना कसा आटोक्यात येईल यावर सविस्तर चर्चा केली. के पूर्व व आर मध्य वॉर्ड मध्ये विशेषकरून इमारतींमध्ये कोरोना वाढत असून पी उत्तर वॉर्ड मध्ये 50 टक्के इमारती व 50 टक्के स्लम मध्ये प्रामुख्याने पठाणवाडी,सोमवार बाजार व वर्लप इस्टेट याठिकाणी कोरोना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.आर मध्य वॉर्ड मध्ये पालिकेच्या व खाजगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी, नर्स रहातात. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने या वॉर्ड मध्ये कोरोना च्या संख्येत वाढ झाली असल्याचे मत त्यांनी मांडले.
अंधेरी पूर्व सहार रोड येथील त्यांच्या कार्यालयात आज दुपारी भेट घेतली असता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याबद्धल त्यांनी आपली मते लोकमतकडे मनमोकळेपणाने मांडली. या तीन वॉर्ड मध्ये कोरोनाने 10000 चा आकडा पार केल्याचे सविस्तर वृत्त लोकमत ऑनलाईन व लोकमत मध्ये सर्व प्रथम प्रसिद्ध केले होते. कोरोनाच्या वाढीस नागरिकांचा निष्काळजीपणा देखिल कारणीभूत असून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून नागरिक तोंडावर मास्क लावत,सोशल डिस्टनसिंग पाळत नाही,कोरोना रुग्ण बाहेर नागरिकांमध्ये फिरतात.तर विशेषकरून इमारतींमध्ये राहणारे नागरिक कोरोना चाचणी व आरोग्य तपासणी करण्यास पालिकेला सहकार्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दर 15 दिवसांनी फेरीवाले व दुकानदार यांची अँटीजेन टेस्ट केली पाहिजे तसेच हॉटेल्स सुरू झाल्यावर तेथील सर्व स्टाफची दर 15 दिवसांनी अँटीजेन टेस्ट करून त्याचे प्रमाणपत्र हॉटेलच्या दर्शनीय भागात लावल्यास ग्राहकांची कोरोनाची भीती कमी होऊन त्यांच्यात आत्मविश्वास येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.मॉल्स सुरू झाले असले तरी,अजून ग्राहकांची संख्या येथे तशी नगण्यच आहे. जुहू चंदन येथील मॉल मध्ये गेलो असता दुपारी 2 पर्यंत फक्त 7 ग्राहक येथे खरेदीसाठी आले होते अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोना रुग्णांसाठी आयएल 6,एफ फेरीटाईन,डी-डीमर,सीआरपी या टेस्ट सूरवातीस काही अंतराने केल्यास रुग्णांच्या स्थितीचा अंदाज येऊन त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलता येते.खाजगी रुग्णांलयात व जम्बो कोविड सेंटर मध्ये ही सुविधा सुरू करणे गरजेचे आहे.तसेच लिव्हर,हार्ट,किडनी व मज्जासंस्था आदी प्रमुख तपासण्या वेळोवेळी केल्यास मृत्यूदर रोखता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
मी व माझे कटुंब ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना राबवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. या संकल्पनेसाठी सर्वसाधारण डॉक्टर,नर्स यांची मदत घेतल्यास आणि शिवसैनिकांनी माध्यम म्हणून या संकल्पनेची त्यांच्या भागातील वस्त्यांमध्ये वातावरण निर्मिती केल्यास खूप चांगला परिणाम दिसेल असे मत त्यांनी व्यक्त केले.