लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या चार दिवसापासून आयकर विभागाच्या झडतीमध्ये सापडलेल्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याने २० कोटींचा टॅक्स चोरल्याचा आरोप करून चॅरिटी ट्रस्टद्वारे विदेशी निधी अधिनियम कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आयकर विभागाने त्याच्यावर ठपका ठेवला आहे. त्याच्या कार्यालयाची तपासणी सुरूच आहे.
याप्रकरणी सोनू सूदला आता चौकशी ईडी, सीबीआयसह गृहमंत्रालयाच्या ‘एफसीआरए’ विभागाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे समजते. सोनू सूदकडून मात्र याबाबत अद्याप कसलेही स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही.
गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईबद्दल आयकर विभागाकडून आज प्रसिद्धपत्रक काढून माहिती देण्यात आली. त्यामध्ये म्हटले आहे की, लखनौमधील एका इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या विविध परिसरातील रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये सोनूने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. याठिकाणी करचोरी आणि पुस्तकांमधील अनियमित नोंदीशी संबंधित पुरावे सापडले आहेत. लखनौच्या समूहाने बोगस बिलांच्या आधारे निधी वळवून गुंतवणूक केली आहे. आतापर्यंत अशा ६५ कोटींच्या बोगस कराराचे पुरावे सापडले असून, १.८ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून, परदेशी नियमन कायद्याचे उल्लंघन केले आहे. सोनू सूद आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, कर चुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत, सोनूने अनेक बोगस कंपन्यांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा दोन नोंदींचा वापर केल्याचे उघड झाले आहे. तसेच संबंधित सर्वांनी बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचेही मान्य केले आहे. तसेच कर चुकविण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून, त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकविला आहे.
------------------------
धार्मिक कामांमध्ये खर्च
सोनू सूदने आपला चॅरिटी ट्रस्ट २ जुलै २०२० रोजी स्थापन केला. या ट्रस्टमध्ये १८ कोटी ९४ लाख रुपये आले. यापैकी एक कोटी ९० लाख रुपये विविध धार्मिक कामांसाठी खर्च करण्यात आले, तर १७ कोटी रुपये अजूनही ट्रस्टच्या खात्यामध्ये आहेत. आयकर विभागाच्या मते, या खात्याची चौकशीत सूदच्या चॅरिटी ट्रस्टला परदेशातूनदेखील दोन कोटी एक लाख रुपयाचा निधी मिळाला आहे.