Join us

फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा 

By सचिन लुंगसे | Published: May 06, 2024 7:46 PM

पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला.

मुंबई : पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून, एप्रिल महिन्यांत हाती घेण्यात आलेल्या मोहीत अंतर्गत २०.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत वसूल करण्यात आलेल्या दंडाच्या तुलनेत यावेळी जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.

मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्स, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन्स आणि हॉलिडे स्पेशल ट्रेन्समध्ये तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोहीम राबविल्या जात आहेत. त्यानुसार, तिकिट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. मुंबई उपनगरीय विभागातून ५.५७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. एसी लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी नियमित सरप्राईज तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते.

या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिलमध्ये ४ हजारांहून अधिक प्रवाशांना दंड ठोठाविण्यात आला आणि १३.७१ लाख रुपये वसूल करण्यात आले. शिवाय पश्चिम रेल्वेच्या वतीने बॅटमॅन २.० तिकिट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे रात्री फुकुट प्रवाशांना पकडले जाते. त्यानुसार, ३, ४ आणि ५ मे रोजी राबविण्यात आलेल्या तपासणी मोहीमेत ३.४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

टॅग्स :मुंबईरेल्वेपश्चिम रेल्वे