नाट्यसंमेलनासाठी २० दिवस स्टेडिअम बंद
By admin | Published: February 11, 2016 02:48 AM2016-02-11T02:48:50+5:302016-02-11T02:48:50+5:30
ठाणे येथे पहिल्यांदाच होत असलेल्या नाट्यसंमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचा शुभारंभ आणि समारोप हा दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात होणार
ठाणे : ठाणे येथे पहिल्यांदाच होत असलेल्या नाट्यसंमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचा शुभारंभ आणि समारोप हा दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात होणार असल्याने ते तब्बल २० दिवस क्रीडारसिकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे येथे सरावासाठी येणाऱ्या क्रि केट आणि अॅथलेटिक्सच्या खेळाडूंचा सराव बुधवारपासूनच थांबला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष असतानादेखील खेळाडूंना सरावापासून वंचित राहावे लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या क्रीडा महोत्सवाकरिता महापालिकेने ३० जानेवारीलाच या स्टेडिअमचा ताबा घेतला होता. त्यानंतर, ३१ जानेवारीला या स्पर्धेचे भव्यदिव्य असे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत हा क्र ीडा महोत्सव या ठिकाणी असल्याने या कालावधीत येथे येणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी मनाई केली होती. असे असताना आता १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या निमित्तानेदेखील ते बंद ठेवण्यात येणार आहे.
या कार्यक्र मासाठी १० फेब्रुवारीलाच हे मैदान अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या पूर्वीचे आठ दिवस, संमेलनाचे तीन दिवस आणि पुढील आठ दिवस असे तब्बल १९ दिवस ते सरावासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्रीडा संकुलात क्रि केटचे २२ नेट सरावासाठी असून या एका नेटची वार्षिक फी ३५ हजार इतकी असून येथील ट्रॅकवर अॅथलेटिक्सचा सराव करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी मिळून सुमारे ३०० खेळाडू येत आहेत. या सर्व खेळाडूंना पुढील १९ दिवस सराव करता येणार नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
खेळपट्टी अॅथलेटिक्स टॅ्रकचेही होणार नुकसान
विशेष म्हणजे नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्र म येथेच होणार असल्याने त्यासाठी मोठे स्टेज आणि एक मंडपही उभारण्यात येत आहे. त्यासाठी सामान आणले जाणार असून त्याचा परिणाम थेट खेळपट्टी आणि अॅथलेटिक्स ट्रॅकवर होणार आहे.
नाट्यसंमेलनाच्या काळात या ठिकाणी तर २० ते २५ हजार नाट्यरसिक एकाच वेळेस जमा होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे उघड्यावर खाद्यपदार्थ शिजवू देणे म्हणजे एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि पालिका प्रशासन यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
नाट्यनगरीला बाळासाहेब ठाकरे, तर प्रवेशद्वारास आनंद दिघे यांचे नाव
ठाण्यात प्रथमच होणाऱ्या नाट्यसंमेलनात शहरातील आठ ठिकाणी विविध कार्यक्रम होत असून मुख्य कार्यक्रम होणार असलेल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या नाट्यनगरीला हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. ९६ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन १९, २०, २१ फेब्रुवारी रोजी होत असले तरी येत्या शुक्रवार, १२ फेब्रुवारीपासून संमेलनापूर्वीच्या स्थानिक कार्यक्रमांस सुरुवात होत आहे.
दादोजी कोंडदेव स्टेडियमबरोबरच गडकरी रंगायतन, मो.ह. विद्यालय, टाऊन हॉल, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे पूर्वेतील युनायटेड स्पोर्ट्स क्लब अशा विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. मुख्य कार्यक्रम होणाऱ्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या नाट्यनगरीला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
तसेच, स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारांना माँसाहेब मीनाताई ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांची नावे देण्यात येणार आहेत. तसेच, स्टेडियममधील मुख्य रंगमंचाला नटवर्य मामा पेंडसे यांचे, तर मो.ह. विद्यालय येथील रंगमंचाला संगीतभूषण पं. राम मराठे यांचे नाव दिले जाणार आहे.
युनायटेड स्पोर्ट्स क्लब येथील रंगमंचाला जे.पी. कोळी यांचे तर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील रंगमंचाला रंगकर्मी अशोक साठे यांचे, मिनी थिएटर रंगमंचाला रंगकर्मी दिलीप पातकर यांचे आणि गडकरी रंगायतन येथील रंगमंचाला नाटककार श्याम फडके यांचे तर टाऊन हॉल येथील रंगमंचाला अभिनेते शशी जोशी यांचे नाव देण्यात येणार आहे.