विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:18 AM2018-09-25T06:18:24+5:302018-09-25T06:18:39+5:30

लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना राज्यात विविध ठिकाणी रविवारी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये २० भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

 20 devotees die due to immersion | विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम!

विसर्जनावेळी २० भक्तांचा बुडून मृत्यू; डीजेबंदीनंतरही दणदणाट कायम!

googlenewsNext

मुंबई : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देताना राज्यात विविध ठिकाणी रविवारी विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनांमध्ये २० भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. काही ठिकाणी मिरवणुकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.
उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घालूनही नाशिक व पुण्यात ध्वनिप्रदूषणाचे नियम पायदळी तुडविण्यात आले. मुंबईत दोन वर्षांच्या तुलनेत आवाजाची पातळी घटल्याचे दिसले. मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे २०० वर गुन्हे नोंदविण्यात आले. पुण्यात ९८ मंडळांवर गुन्हे नोंदविण्यात आले.
कोल्हापूरला महापौर शोभा बोंद्रे यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. पोलिसांच्या लाठीमारात १३ कार्यकर्ते जखमी झाले.
शिरपूरजैन (वाशिम) येथे दोन गटांत हाणामारी झाली. ६०पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा दाखल झाला. गुहागरमध्ये (रत्नागिरी) दोन गटांत झालेल्या हाणामारीत आठ जण जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे. हाणामारीत तलवारी, लोखंडी पाईप व काठ्यांचा वापर झाला. खामगावला (बुलडाणा) गणेशभक्तांचा पोलिसांशी वाद झाल्याने केलेल्या लाठीचार्जमध्ये तीन नगरसेवकांसह काही गणेशभक्त जखमी झाले. शहाद्यात (नंदुरबार) विसर्जन मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केली.
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या दुर्घटनांत नितीन मराठे (३२), मनीष दलाल, प्रफुल्ल पाटील, अविनाश कोळी (२०) यांचा बुडून मृत्यू झाला. पवनी (भंडारा) येथे संकेत कन्नाके (१६) व वैभव आडे (१४) यांना तलावात जलसमाधी मिळाली. सातारा येथे विसर्जनानंतर कृष्णा नदीपात्रात संगम माहुली येथे अंघोळ करण्यासाठी गेलेल्या मुन्ना साव (२४) व गुलाब गोसावी (५२) यांचा बुडून मृत्यू झाला.
पुणे जिल्ह्यात पिंपरी कावळ (ता. जुन्नर) येथे तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले बुडाली होती. त्यापैकी वैभव पाबळे (११), गणेश चक्कर (९), सुमित पाबळे (११) यांचा मृत्यू झाला. दोघे अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यात पिंपळस (राहाता) येथे सागर कदम (२४) पाय घसरुन तळ्यात पडला़ संगमनेरला नीरज जाधव (२८) प्रवरा नदीत खड्ड्यात पडून बुडाला. मुंबईत भांडुप पूर्वेकडील भांडुपेश्वर कुंड तलावात बुडून यज्ञेश माळेकर याचा मृत्यू झाला.

पुणे, मोबाईलवर चोरट्यांनी मारला हात
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजारांहून अधिक घटना घडल्या. मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करुन आलेल्या टोळीतील ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून ७५ हॅण्डसेट जप्त करण्यात आले. लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक येथे चोरीच्या घटना घडल्या़ अनेकांचे पाकीटही लांबविले.

डीजेच्या तालावर नाचले भाजपा आमदाराचे मंडळ
नाशिकमध्ये भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट करत उल्लंघन केले़ मिरवणुकीत कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली. पोलिसांनी मात्र डीजे नाही तर सूचना देण्यासाठी स्पीकर लावल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे़
 

Web Title:  20 devotees die due to immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.