मुंबई : राज्यातील २० जिल्ह्यांना आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहावी लागणार आहे. कारण, मंगळवारच्या विस्तारात त्यांच्या नशिबी भोपळा आला आहे. मंत्रिपदापासून वंचित असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या ११ जिल्ह्यांपैकी आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलडाणा, वाशिम, अकोला हे जिल्हे आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील चारपैकी तीन जिल्ह्यांना (जळगाव, नाशिक, अहमदनगर) स्थान मिळाले पण धुळे जिल्हा वंचित राहिला. कोकणातील पालघर तर मुंबईतील मुंबई उपनगर जिल्ह्याला प्रतिनिधित्व नाही. मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांपैकी औरंगाबाद, उस्मानाबादला संधी मिळाली; पण परभणी, नांदेड, जालना, हिंगोली, बीड आणि लातूर हे सहा जिल्हे वंचित राहिले.
औरंगाबादचे तीन मंत्री
औरंगाबाद सर्वात लकी जिल्हा ठरला. संदीपान भुमरे, अतुल सावे आणि अब्दुल सत्तार असे तिघे कॅबिनेट मंत्री झाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याकडे गेले. ठाण्याला दोन (स्वत: मुख्यमंत्री शिंदे आणि रवींद्र चव्हाण) आणि जळगावलाही दोन (गिरीश महाजन, गुलाबराव पाटील) मंत्रिपदे मिळाली. उपराजधानी नागपूर शहर व जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटेच आहेत.
मुख्यमंत्र्याचा दौरा झाला पण...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर होते. त्यामुळे आ. बालाजी कल्याणकर व आ. संतोष बांगर यांच्या समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यांनाही संधी मिळाली नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत (परंडा) यांची वर्णी लागल्याने या जिल्ह्याचा खूप दिवसांचा अनुशेष भरुन निघाला आहे.
उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक पाच मंत्रिपदे
उत्तर महाराष्ट्राला (राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, विजयकुमार गावीत) पाच मंत्रिपदे मिळाली.
विदर्भात
मराठवाड्याच्या पदरी चार मंत्रिपदे पडली. विदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासह केवळ तीन मंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्राला तीन मंत्रिपदांवर (चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, शंभूराज देसाई) समाधान मानावे लागले. मुंबईसह कोकणातील पाचजण (मुख्यमंत्री शिंदे, उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा) मंत्रिमंडळात आहेत.