नालासोपारा आगारात जादा सेवा देण्यासाठी २० चालक नाशिकहून दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 05:47 PM2020-07-24T17:47:49+5:302020-07-24T17:48:24+5:30
नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या
मुंबई : नुकताच नालासोपारा येथे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर नोकरदारांना एसटी बसची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी नालासोलारा रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोको केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची पावले एसटी महामंडळाने उचलली आहेत. नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. हि जादा सेवा देण्यासाठी नाशिकहून २० चालक दाखल झाले आहेत.
नालासोपारा येथील नोकरदारांना २२ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एसटीची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट नालासोपारा रेल्वे स्थानक गाठले. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत रेल्वे रुळावर उतरले. साधारण २०० जणांनी लोकल काही वेळ थांबवून ठेवली. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी सामान्य प्रवाशांना रेल्वे रुळावरून जाण्यास सांगितले. सध्या फक्त निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु आहे. सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही अशी समज पोलिसांनी प्रवाशांना दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना हटविण्यात आले. या घटनेनंतर खबरदारी म्हणून एसटीने नालासोलारा आगारातून १२० ते १३० फेऱ्या होत होत्या. तर, आता ३० ते ४० फेऱ्या वाढविल्या आहेत.
नालासोलारा आगारासह इतर आगारातून नालासोलारा येथे सकाळी आणि सायंकाळी चालक वाहकास जव्हारवरून ४ एसटी बस, भोईसरवरून १० एसटी बस, पालघरवरून १२ एसटी बस, सफाळेवरून ५ एसटी बस येतात. नालासोलारा आगाराला दररोज सुमारे २ लाख ८० हजार रुपये उत्पन्न मिळत आहेत.
नालासोलारा आगारात एकूण १०५ चालक आहेत. मात्र यापैकी फक्त ३० चालक येत आहेत. गैरहजर चालक सातारा, विदर्भ या भागात सध्या अडकले आहेत. त्यामुळे त्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी सोय नाही. परिणामी, एसटीच्या सेवा वाढविण्यासाठी नाशिकहून २० चालक नालासोलारा येथे दाखल होऊन सेवा देत आहेत.
नालासोपारा आगारातून १२० ते १३० फेऱ्या धावत होत्या. आता १५० ते १६० फेऱ्या धावत आहेत. नाशिकहून देखील चालक दाखल झाले आहेत. नालासोलारा आगारातील जे चालक गैरहजर आहेत. त्यांना फोन करून बोलाविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया नालासोलारा आगार व्यवस्थापक प्रज्ञा सानप-उगले यांनी दिली.