फास्ट लोकल पकडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दादर स्थानकावरील प्रवाशांना मिळणार मोठा फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 10:32 AM2024-10-01T10:32:14+5:302024-10-01T10:36:44+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Mumbai Local : मुंबईलोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या काही दिवसांत मुंबईलोकलच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात येणार असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरुन अप आणि डाऊन मार्गावरील २० जलद लोकल आता दादर स्थानकावरुन सुटणार आहेत. सीएसएमटी आणि दादर स्थानकातील या स्थानकांवर होणार प्रचंड गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार २० अप आणि डाऊन लोकल दादर स्थानकावरून धावणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या या वेळापत्रकात ५ ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे लोकलवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीतून लोकांना प्रवास करावा लागत आहे. दादर, परळ, भायखळा इथल्या कार्यालयांमधील लोक बसण्यासाठी जागा मिळेल या उद्देषाने कल्याण दिशेकडे जाणाऱ्या डाऊन लोकल पकडण्यासाठी सीएसएमटी गाठतात.
सीएसएमटीवरून २५४ जलद लोकल सुटतात. त्यातील अनेक लोकल फलाट नसल्याने उशीरा धावतात आणि सिग्नलमुळे सीएसएमटी-दादर दरम्यान अनेक वेळ उभ्या असतात. त्यामुळे आता २० जलद लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून धावणार आहेत. त्यामुळे लोकल वेळेत पोहोचण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच दादर स्थानकावरील गर्दी देखील यामुळे विभाजित होणार असल्याचा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे ५ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्राकानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून १० अप आणि १० डाऊन फास्ट लोकल फेऱ्या धावणार आहेत. यामुळे सध्याच्या लोकलला लागणारा वेळ वाचवता येणे शक्य होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या सुरू असलेल्या कामामुळे राम मंदिर – गोरेगाव – मालाड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर ताशी ३० किमी वेगमर्यादा लावण्यात आली आहे. हे वेगावरील निर्बंध २ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल संथगतीने धावणार आहे. नवीन सिग्नलिंग प्रणालीची चाचणी घेण्यासाठी राम मंदिर – गोरेगाव – मालाड स्थानकांदरम्यान ३० सप्टेंबरपासून लोकलच्या वेगावर निर्बंध लादण्यात आले आहेत.