महापालिकेच्या पे पार्किंगमध्ये साचलं 20 फूट पाणी, 350-400 गाड्या बुडाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 12:32 PM2021-07-19T12:32:31+5:302021-07-19T12:37:45+5:30
BMC's pay and park:अग्निशमन दलाकडून पार्किंगमध्ये साचलेले पाणी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मुंबई: मुंबई शहर व उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पाण्यात शेकडो-हजारो गाड्या अडकल्या आहेत. दरम्यान, कांदिवली भागातील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मुंबई महापालिकेच्या अंडरग्राउंड पे पार्किंगमध्ये 20 फुटांच्या वर पाणी साचले असून, यात 350-400 वाहनं बुडाल्याची माहिती आहे.
मुंबईत रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. कुणाच्या घरात पाणी शिरलं, तर कुणाची गाडी पावसाच्या पाण्यात अडकली. तिकडे, कांदिवलीमधील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये महापालिकेचं अंडरग्राउंट पे पार्किंग आहे. यात 350-400 वाहनं होती. यात प्रामुख्याने कार आणि रिक्षांचा समावेश आहे. या पार्किंगमध्ये रसत्यावरील पाणी साचल्यामुळे गाड्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
सध्या अग्निशमन दलाकडून पार्किंगमध्ये साचलेलं पाणी पंपाच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्यामुळे सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसला आहे. कोरोना काळात अनेकजण आपले रिक्षा याच पार्किंगमध्ये पार्क करत होते. तसेच, काही महागड्या कारही इथे पार्क करण्यात आल्या होत्या. या सर्व गाड्या आता पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.