CoronaVirus News: मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांनी वाढ; चिंता पुन्हा वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:35 AM2020-09-06T01:35:53+5:302020-09-06T01:36:20+5:30
काळजी घ्यायला हवी
मुंबई : मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. मागील आठवड्याभरात शहर-उपनगरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले असून मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
काही दिवसांपूर्वी १८ हजारांच्या घरात असलेले सक्रिय रुग्ण सध्या २२ हजारांपर्यंत पोहोचले आहेत. नुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि अनलॉकचा सुरू झालेला दुसरा टप्पा हा पुन्हा एकदा मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरत आहे.
जून, जुलै आणि आॅगस्ट मध्यापर्यंत स्थिरावलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका व राज्य शासनासमोर पुन्हा एकदा आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे. आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णनोंद वाढते आहे. ४ सप्टेंबर रोजी २२ हजार २२० सक्रिय रुग्ण नोंद झाली आहे, त्यापूर्वी, ३ सप्टेंबर रोज २१ हजार ४४२, २ सप्टेंबर रोजी २० हजार ८१३ , १ सप्टेंबर रोजी २० हजार ६५ आणि ३१ आॅगस्ट रोजी ही संख्या २० हजार ५५४ इतकी होती.
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढली आहे. शिवाय, अनलॉकमुळे प्रवास- वाहतूक वाढल्याने रुग्णसंख्येचा आलेख चढता दिसून येतो आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.
शहर उपनगरात शुक्रवारी १९२९, गुरुवारी १५२६, बुधवारी १६२२, मंगळारी ११४२ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ३ आॅगस्ट रोजी मुंबईत अवघे ७०५ रुग्ण आढळले होते, परंतु, सप्टेंबरमध्ये ही संख्या हजारांच्या घरात पोहोचली आहे.