Join us

मानसिक आजारावरील औषधात २० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

मुंबई : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांच्या मनस्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक, सामाजिक समस्या, राेजगार अशा चिंतांसह आपले व ...

मुंबई : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांच्या मनस्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक, सामाजिक समस्या, राेजगार अशा चिंतांसह आपले व कुटुंबाचे काय हाेईल, अशा विचारांचा घाेर लागला असून या चिंतेमुळे मानसिक आजारांमध्ये सुमारे ६० टक्के प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी यावरील औषधांची विक्रीदेखील २०-३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

काेराेनामुळे अनेकांनी आप्तेष्टांना गमावले. अनेकांना वाचविलेही आहे, अनेक जण काेराेनातून सुखरूप बरेही झाले आहेत, पण हा अनुभव आजही त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारा ठरताे. आपल्याला पुन्हा काेराेना झाला तर, आपणही गेलाे तर कुटुंबाचे काय हाेईल, ही भीती वाढली आहे. साेशल मीडिया व वाहिन्यांवरील बातम्यात काेराेना, बाहेर फिरला तर काेराेना हाेईल, घरी राहिले तर काेराेनाचीच चर्चा यामुळे काही लाेकांच्या मनात धास्ती वाढली आहे, अशी माहिती मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. व्यंकट सोमण यांनी सांगितले.

लाॅकडाऊनमध्ये लाेक घरीच राहिले, हाताला काम नाही, जीवनशैलीत झालेला बदल, अपुऱ्या साेयीसुविधा यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे.

महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे परिमल मणियार यांनी सांगितले, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांमध्ये नैराश्य आल्याचे दिसत आहे. नैराश्य घालविण्यासाठी, लागणारी झाेप येण्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मानसिक तणावासह भीतीमुळे वाढ झालेल्या रक्तदाब, हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीतही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाईट अनुभवांमुळे औदासिन्य वाढले आहे. यातून व्यसनाधीनता, चिडचिड व इतर समस्याही वाढल्या आहेत. सर्वांची हानी झाल्याने व्यवसाय बुडाल्याचे वैषम्य कमी आहे, पण मानसिक आजाराबाबत जागरूकता येत आहे. अनपेक्षित परिस्थितीमुळे ताण येणारच, पण यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या हाती नेमके जे आहे, त्यावर काम करावे लागेल.

तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?

ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तत्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाट्याने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात. मेंदूतील हिपोकंपस आक्रसतो व ठरावीक मानसिक आजार होतात.

तणावामुळे होणारे आजार

रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असते. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार-बलात्कार-सार्वजनिक ठिकाणी अपमान यापैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो.

दोन्ही उपचारपद्धती एकत्र येणे महत्त्वाचे

डॉ नूतन व्होरा, मानसोपचार तज्ञ

नैराश्यात समुपदेशनाचा खास उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होते हा खूप मोठा गैरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. नाही तर त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य असते.