Join us  

"याच दबावाने आणि घिसाडघाईने २० निरपराध कामगारांचा हकनाक बळी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 7:52 AM

'समृद्धी' महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असेलही, पण तुमचे हे 'स्वप्न' निरपराध्यांसाठी 'काळस्वप्न' ठरत आहे, त्याचे काय?

मुंबई - समृद्धी महामार्गावरीलअपघातांची मालिका काही केल्या संपत नाही. सोमवारी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत २० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर प्रशासकीय यंत्रणा मदतीसाठी तात्काळ पोहोचली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र, याच महामार्गावर पुन्हा एकदा घडलेल्या मोठ्या दुर्दैवी घटनेने २० गोरगरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अशा घटनांवर कायमचा उपाय काय, असा सवाल शिवसेनेनं राज्य सरकारला विचारला आहे. 

'समृद्धी' महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असेलही, पण तुमचे हे 'स्वप्न' निरपराध्यांसाठी 'काळस्वप्न' ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या 'मृत्यू'ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू असल्याचे शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून म्हटले आहे. शहापूर येथील सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले. राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला 'समृद्धी' कशी म्हणणार? अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते-धर्ते हेच आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?, असा सवालही शिवसेनेनं राज्यकर्त्यांना विचारला आहे.

या महामार्गाचा 'अपघातांचा महामार्ग' असा बदलौकीक होत आहे. नावात समृद्धी असलेल्या महामार्गाबाबत ही परिस्थिती ना सरकारसाठी भूषणावह आहे ना जनतेसाठी सुखावह, परंतु तरीही महामार्गाचे उर्वरित 200 किलोमीटर कामाचे घोडे पुढे दामटले जात आहे. ज्या सरलांबे येथील पुलावर सोमवारची दुर्घटना घडली त्या पुलाच्या कामाबाबतही सरकारची हीच घिसाडघाई सुरू असल्याचा आरोप आहे. पुलाचे उरलेले 20 टक्के काम पुढील महिनाअखेर पूर्ण करण्याचे 'टार्गेट' कंत्राटदार कंपन्यांना दिले गेले आहे. त्यामुळे रात्रंदिवस, पावसाळी वातावरणातही या पुलाचे काम सुरूच आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने 20 निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला. त्यांच्या कुटुंबांना उघड्यावर पाडल्याचेही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात लक्झरी बसला झालेल्या अपघातावरून सरकारने संबंधित बस चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मग आता सोमवारच्या दुर्घटनेबाबत काय करणार आहात? कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवणार आणि स्वतः पुन्हा मोकळे होणार!

७ महिन्यात मृतांची संख्या १२७

शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली. त्यात २० कामगारांचा जागीच मृत्यू झाला. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला. आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे. नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यकर्त्यांनी दुःख वगैरे व्यक्त केले, पण अशी वेळ समृद्धी महामार्गाबाबत वारंवार का येत आहे, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात? गेल्या फक्त सात महिन्यांत या महामार्गावरील अपघाती बळींची संख्या १०७ एवढी झाली आहे. त्यात सोमवारच्या दुर्घटनेतील २० दुर्दैवी मृत्यूंची भर पडली. नागपूर ते मुंबई या महामार्गाने प्रवासाचा काळ कमी केला खरा, पण तोच अनेकांसाठी 'काळ' बनून त्यांचे जीव घेत आहे. 

टॅग्स :अपघातशिवसेनाठाणेसमृद्धी महामार्ग