मुंबई : मुंबईतील चार आरटीओ कार्यालयाकडून १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ॲप आधारित १,६९० कॅबची तपासणी करण्यात आली. दोषी आढळलेल्या ४९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १९.७६ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील परिवहन कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकांकडून ॲप आधारित कॅब वाहनांची व चालकांची नियमितपणे तपासणी केली जाते. तपासणीत विहीत अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या, दोषी वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा व नियमांतर्गत कारवाई करण्यात येते.
- ताडदेव आरटीओ कार्यालयांतर्गत ५९० वाहनांची तपासणी करून १०७ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. अंधेरी कार्यालयांतर्गत ७८२ वाहनांच्या तपासणीमध्ये २११ वाहने दोषी आढळली. ७ लाख ९३ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वडाळा कार्यालयांतर्गत ३१८ वाहनांच्या तपासणीत १७३ वाहने दोषी आढळली व त्यांच्याकडून ४ लाख ४१ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली.